नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन व आणिबाणी सेवा विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मनपाचे रुग्णालय व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडीट करण्यास सुरुवात झालेली आहे. याशिवाय शहरातील १०० व त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा देखील तपासण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे रुग्णालयात आगीच्या दुर्घटना टाळण्याकरीता मनपाद्वारे यासंदर्भात पुढाकार घेतला आहे.
आरोग्य सेवा रुग्णालय, सहसंचालक मुंबई यांनी सर्व महापालिकेच्या अग्निसुरक्षेतेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी फायर ऑडिट करण्याचे निर्देश निर्गमित केले आहेत. त्यानुसार मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व आंचल गोयल, अति. आयुक्त यांच्या मार्गदर्शनात व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात रुग्णालयांच्या तपासणीसाठी चार सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही चार सदस्यीय चमू अग्निशमन विभागाच्या जवानांसोबत रुग्णालयांची तपासणी करीत आहे. या चमूमध्ये डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. गोवर्धन नवखरे व डॉ. सरला लाड यांचा समावेश आहे.
डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले की, रुग्णालयांच्या तपासणीमध्ये फायर अलॉर्म, फायर स्मोक डिटेक्टर, अग्निरोधक (आग विझविण्याचे यंत्र), फायर हायड्रेंट, फायर लिफ्ट यासह अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यांन्वित असल्याची खात्री करणे व दरमहा दुसऱ्या मंगळवारी रुग्णलयामध्ये नियमितपणे मॉक ड्रिल करण्याचे निर्देश सुध्दा देण्यात आले आहेत. तसेच डॉक्टर, नर्सेस व इतर स्टॉफला आगीसारख्या अप्रिय घटनेप्रसंगी रुग्ण, कर्मचारी व अभ्यागतांना बाहेर काढण्याकरीता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे सुध्दा निर्देशित केले आहे.