संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते अरविंद सहकारी बँक लि.च्या कामठी शाखेचे उद्घाटन.
चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. सुलेखाताई कुंभारे, . सुधाकर कोहळे, रणजीत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती.
बँकेचे अध्यक्ष डॉ. आशिष र. देशमुख यांनी आणल्या ग्राहकांसाठी ४ नव्या योजना.
कामठी ता प्र 27:-सहकारी बँकिंगमध्ये अरविंद सहकारी बँकेचे १००० कोटी रुपयांचे डिपॉझीट आणि १६०० कोटी रुपयांचे टर्नओव्हर ही मोठी उपलब्धी आहे. ही बॅंक ‘A ग्रेड’ मध्ये आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात अरविंद सहकारी बँकेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. इलेक्ट्रिक वेहिकल, सोलर सारख्या व्यवसायांना बँकेने कमी दरात कर्ज उपलब्ध करून द्यावे. ग्राहकांकडून कर्जाची परतफेड ही बँकेसाठी आणि समाजासाठी महत्वाची आहे. कामठी येथे मोठे व्यवसाय आणण्याची गरज आहे. युवकांच्या कौशल्य विकासासाठी अरविंद सहकारी बँकेने विविध विषयांवर सेमिनार आयोजित केल्यास अनेकांना रोजगार मिळू शकतो. अरविंद सहकारी बँकेचा ट्रॅक रेकॉर्ड, उत्कृष्ट बॅलंस शीट, एनपीए १.७८% आणि ग्राफ चांगला असून आर्थिक प्रगती व कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे या बँकेचा उपयोग कामठीला होणार आहे. कामठीमध्ये मेट्रो रेल्वे येणार पण त्यासाठी रस्ते रुंद हवेत, अतिक्रमण नको. १-२ महिन्यात नागपूर ते कामठी-कन्हान मेट्रो रेल्वेचे काम सुरु होणार आहे. आज ४०% नागपूरला २४ तास पाणी पुरवठा होत आहे. पण डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण नागपूरला २४ तास पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होणार आहे”, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. अरविंद सहकारी बॅंक लि. च्या कामठी शाखेचा उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते दि. २७ ऑगस्ट २०२३ ला संपन्न झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रणजीत देशमुख (माजी कृषी मंत्री, म.रा.), प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर बावनकुळे (माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष), ॲड. सुलेखाताई कुंभारे (माजी राज्यमंत्री, म.रा.) व आमदार सुधाकर कोहळे हे उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “लहान कारागिरांना केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेसाठी अरविंद सहकारी बँकेची गरज पडणार आहे. डॉ. आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात बँकेने मोठी प्रगती केली आहे. कामठीतील जास्तीत जास्त लोकांना बँकेने कर्ज उपलब्ध करून त्यांना योग्य रोजगार देण्यात यावा. गडकरी साहेबांनी कामठी ते गुमथळा रस्त्याचे सिमेंटीकरण कामास मंजुरी द्यावी.”
ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनीसुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. . रणजीतबाबू देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
अरविंद सहकारी बॅंक लि.चे अध्यक्ष डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करतांना ते म्हणाले, “माझे प्रेरणास्त्रोत नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते अरविंद सहकारी बँक लि. च्या कामठी शाखेचा शुभारंभ होत आहे, याचा मोठा आनंद आहे. ५ ट्रिलीयन इकॉनॉमी आणि जगातील तिसरी आर्थिक महासत्ता होण्याच्या मोदीच्या प्रयत्नात गडकरी साहेबांचा वाटासुद्धा आहे. . अमित शाह यांच्या नेतृत्वात सहकार क्षेत्र पुनर्जीवित करून त्याचा विकास करण्याचे कार्य फार मोठे आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण सशक्त करण्याचे काम निरंतर होत आहे. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या नियमांप्रमाणे अरविंद सहकारी बँक लि. ची सेवा १८ मार्च १९९८ ला लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. निरंतर प्रगती करत आज या लोकप्रिय बँकेने विदर्भातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. विधायक कार्याचे जनक स्व. अरविंद देशमुख यांच्या नावाने कार्यरत अरविंद सहकारी बँक लि. च्या काटोल, सावनेर, गांधीबाग नागपूर, डिगडोह नागपूर, वरुड, अमरावती अशा ६ शाखा आहेत. सातवी शाखा कामठी येथे आज ग्राहक सेवेत रुजू होत आहे. ‘लंच ब्रेक’ न घेता ११ तास आणि रविवारीसुद्धा ग्राहक सेवेचा लाभ कामठी परिसरातील ग्राहकांना घेता येणार आहे. १००० कोटींच्या डिपॉझीटचे उद्दिष्ट बँकेने पूर्ण केले असून बँकेचा टर्नओव्हर १६०० कोटींचा आहे. बँकेसाठी उत्कृष्ट ग्राहक-सेवा सर्वोच्च आहे. बँकेच्या आर्थिक प्रगतीचे आणखी एक पाऊल म्हणजे कामठी येथे लोकसेवार्थ नवीन शाखा सुरु करून चांगली सेवा देणे आहे. रिझर्व बँकेच्या निर्देशाप्रमाणे डोअर टू डोअर बँकिंग सेवा कामठीवासियांना उपलब्ध करून देणार आहोत. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अरविंद सहकारी बॅंक लि. कामठी शाखा ही सुद्धा ग्राहकांना चांगली सेवा देईल.”
गडकरी यांच्या हस्ते QR कोड, PFMS सेवा, नियमित परतफेड करणाऱ्या ग्राहकांना व्याजात ०.२५% सूट आणि इलेक्ट्रिक वेहिकल / सोलरवरील कर्जावरील व्याजात १% सूट अशा ४ नवीन योजनांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. अरविंद सहकारी बॅंक लि., कामठी शाखेच्या उद्घाटन समारंभास परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.