कबड्डी स्पर्धा : मराठा, साई, रेणूका, साईराम, तरुण सुभाष, सेवन स्टार, नागसेन संघाचीही अंतिम फेरीत धडक
नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेमध्ये नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळ व ओम अमर क्रीडा मंडळ आणि मराठा लॉन्सर्स व रवींद्र क्रीडा मंडळ संघाने पुरूष व महिला गटात अंतिम फेरीत धडक दिली आहे.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये स्पर्धेची अंतिम लढत होईल. मंगळवारी (ता.16) स्पर्धेची उपांत्य फेरी पार पडली. यामध्ये सीनिअर पुरूष गटात एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर संघाने उमरेडच्या शक्ती जिम संघाचा ३८-२३ अशा गुणफरकाने म्हणजे १५ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत स्थान पक्के केले. तर दुस-या उपांत्य सामन्यात नागपुरातील ओम अमर क्रीडा मंडळ (४२) संघाने भिवापूर येथील भिमादेवी (३६) संघाचा ६ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीतील एकलव्य संघाचे आव्हान स्वीकारले.
सीनिअर महिलांच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यात मराठा लॉन्सर्स महाल संघाने काटोल येथील साई स्पोर्ट्स संघाचा ३८-३२ असा म्हणजेच ६ गुणांनी पराभव केला. तर दुस-या उपांत्य सामन्याम उमरेड येथील रवींद्र क्रीडा मंडळ संघाने (३१) संघर्ष क्रीडा मंडळ, नागपूर (०४) संघाचा २७ गुणांनी पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली.
अन्य सामन्यांमध्ये अंतिम फेरीत ज्यूनिअर मुलींमध्ये मराठा महाल संघाचा सामना साई स्पोर्ट्स काटोल संघाशी तर सबज्यूनिअर मुलींमध्ये साई स्पोर्ट्स काटोल संघाची लढत रेणूका अजनी संघाशी होईल. ज्यूनिअर मुलांमध्ये साईराम, रामटेक विरुद्ध तरुण सुभाष, सोनेगाव बोरी अशी आणि सबज्यूनिअर मुलांमध्ये सेवन स्टार, कामठी विरुद्ध नागसेन, कामठी यांच्यात लढत होईल.