व्हीपीडी सर्वेक्षणासंदर्भात डॉक्टरांचे प्रशिक्षण
नागपूर, ता. १२ : नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे रोग प्रतिबंधात्मक लस अर्थात व्हॅक्सिन प्रिव्हेन्टेबल डिसीज (व्हीपीडी) सर्वेक्षणासाठी मनपाचे सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण देण्यात आले. यासंदर्भात सोमवारी (ता.११) मनपाच्या महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवन येथे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले.
सभेत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद साजीद उपस्थित होते.
यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद साजीद यांनी उपस्थित झोनल वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिका-यांना प्रशिक्षण दिले. नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय, खासगी दवाखाने व इस्पीतळांसाठी महत्वाची सूचना प्रसारित करण्यात आली. त्यानुसार पुरळजन्य ताप अर्थात फिवर रॅश (एफआर) व ॲक्यूट फ्लॅक्सिड पॅरालेसिस (एएफपी) या प्रकारातील रुग्ण आढळल्यास त्याची माहिती त्वरीत जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद साजीद यांना व संबंधित झोनल वैद्यकीय अधिका-यांना देण्याचे आवाहन करण्यात आले. व्हीपीडी सर्वेक्षण ही सर्व सरकारी व खाजगी वैद्यकीय संस्था व डॉक्टरांची जवाबदारी असून सर्वांनी यासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिपाली नासरे यांनी केले.
आरोग्य विभागाच्या आवाहनानुसार गोवर निर्मूलनासाठी कोणत्याही वयोगटातील फिवर रॅश (एफआर)च्या रुग्णांची माहिती तात्काळ देणे आवश्यक आहे. फिवर रॅश (एफआर) प्रकारात मिझल्स, रूबेला, स्कार्लेट फिवर, डेंग्यू, टोक्सोप्लाझोसिस, चिकुन गुनिया, स्क्रब टायफस, मोनोन्यूक्लियोसिस, मेनिन्गोकोसेमिया, कावासाकी यासह इतर संसर्गजन्य आजारांचा समावेश होउ शकतो.
याशिवाय ॲक्यूट फ्लॅक्सिड पॅरालेसिस (एएफपी) अंतर्गत पोलिओ निर्मूलनाच्या सर्वेक्षणासाठी १५ वर्ष वयापर्यंतच्या संशयित रुग्णांची माहिती देणे आवश्यक आहे. ॲक्यूट फ्लॅक्सिड पॅरालेसिस (एएफपी) प्रकारात कोणत्याही प्रकारचे जीबीएस, ट्रान्सव्हर्स मायलाइटिस, पोस्ट-डिप्थेरिक पॉलीन्यूरिटिस, फ्लॅकसिड पॅराप्लेजिया, फ्लॅकसिड क्वॉर्डरिप्लेजिया, आयसोलेटेड बल्बर पॅरालेसिस, आयसोलेटेड क्रॅनियल नर्व्ह पाल्सी (फेसियल पाल्सी, पॅलाटल पाल्सी), व्हायरल न्यूरिटिस, ट्रॉमॅटिक फ्लॅकसिड हेमिप्लेजिया ऑफ न्यूरिटिस, लोअर मोटर न्यूरोन टाईप, मोनोपेरेसिस विथ इनटॅक्ट रिफ्लेक्सेस, नेक/रिस्ट/फूट ड्रॉप, फक्त काही काळ टिकणारा क्षणिक पॅरेसिस यांचा समावेश होउ शकतो. उपरोक्त सर्व संशयित रुग्णांचे योग्य ते नमूने घेऊन तपासणी करण्यात येईल.
या सर्व आजारांचे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती तात्काळ देणे तसेच डिप्थीरिया, पेर्टुसिस, न्यूओनॅटल टिटॅनस यांचे संशयित रुग्ण आढळल्यास त्वरीत 7719931363 या क्रमांवर माहिती देण्याचेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे.