गडकरींकडून झाडाझडती; अखेर ‘त्या’ महामार्गाच्या दुरुस्तीला मुहूर्त

औरंगाबाद :- सोलापूर – ऐडशी ते औरंगाबाद – करोडी – तेलवाडी – कन्नडमार्गे धुळ्याकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ चे वर्षभरापूर्वीच केंद्रीय मंत्री गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते. मात्र निकृष्ट कामामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उखडला होता. यामार्गावर टोलनाके उभारून कोट्यवधीचा महसूल जमा करणारे संबंधित ठेकेदार रस्ता दुरुस्तीकडे कानाडोळा करत होते. वर्षभरातच उखडलेला रस्ता, खड्ड्यातून प्रवास मग टोल का द्यायचा, असा सवाल प्रत्येकालाच पडला होता. सदर रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना ठेकेदार आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे (NHAI) अधिकारी पावसाचे कारण पुढे करत वेळ मारून नेत होते.

उखडलेला रस्ता तातडीने दुरूस्त करा आणि चिखल, धुळीतून आमची सूटका करा, अशी वेळोवेळी मागणीही प्रवाशांकडून केली जात होती. मात्र नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे देणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण टेंडरनामाच्या वृत्तमालिकेनंतर सुतासारखे सरळ झाले. अखेर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची कान उघाडणी केली. उखडलेल्या रस्त्याचे मोजमाप घेतले. या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती सुरू केली. यामुळे गावागावातून पसरलेल्या संतापाचे आनंदात रुपांतर झाले असून, सोलापूर ते कन्नड पर्यंत सर्वच स्पाॅटचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम सर्वच ठेकेदारांमार्फत हाती घेतल्याचे प्रकल्प संचालक डाॅ. अरविंद काळे यांनी टेंडरनामाशी बोलताना सांगितले.

गडकरींनी खडसावल्याचा परिणाम

मध्यप्रदेशातील सुमारे ४०० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या जबलपूर – मंडला या ६३ किलोमीटर लांबीतील रस्त्याचे काम खराब झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जनतेची जाहीर माफी मागितली होती. दरम्यान याच वृत्ताचा आधार घेत ‘टेंडरनामा’ने सोलापूर – धुळे या उखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाकडे लक्ष वेधण्यासाठी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘गडकरीजी, ‘या’ ४ हजार कोटींच्या रस्त्याबद्दलही माफी मागणार का?’ अशा शीर्षकाने वृत्त प्रसिध्द केले होते. यासंदर्भात आधी ५ ऑगस्ट २०२२ रोजीही टेंडरनामाने वाचा फोडली होती. वृत्तमालिकेची दखल घेत गडकरी यांनी मराठवाडा – खांदेश – मध्य प्रदेश – उत्तर प्रदेशला जोडणाऱ्या सोलापूर – धुळे या रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जामुळे उखडलेल्या महामार्गाबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांवर बराच संताप व्यक्त केला. गडकरींनी केलेल्या सवालांवर अधिकाऱ्यांना कुठलेही प्रतिउत्तर देता आले नाही. अखेर दुरुस्तीचे काम अधिकाऱ्यांनी तातडीने सुरू केले.

अशा आहेत गडकरींच्या सूचना

तसेच गडकरींनी दिलेल्या सूचनेनुसार कन्नड येथील औट्रम घाट आणि चाळीसगाव – धुळे हायवेचे उर्वरीत काम तातडीने पूर्ण करा, खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, खालचा जुना भाग काढून नव्याने चांगला रस्ता करा, ज्या ठिकाणी सखल भागात पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नाही, तेथे व्हाईट टाॅपिंग करा, काॅंक्रिट गटाराची देखील साफसफाई करा, विविध चौकात तयार केलेले वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करा, पथदिव्यांच्या टायमर सिस्टीमकडे देखील लक्ष द्या, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्याप्रमाणे प्रकल्प संचालक काळे यांनी कामास सुरूवात केली आहे.

अखेर महामार्गाचे भाग्य उजाळणार

सोलापूर – धुळे हा चार हजार कोटींचा नवाकोरा महामार्ग दोष निवारण कालावधी आधीच उखडल्याचे ‘टेंडरनामा’ने उघड केले. पुढे कन्नड घाटात रुंदीकरण की भुयारी मार्ग असाही प्रश्न उपस्थित केला. एवढेच नव्हेतर चाळीसगाव ते धुळे या एक हजार कोटींच्या रस्ते कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणावर देखील प्रहार केला. या नव्याकोऱ्या मार्गात जागोजागी भगदाड पडल्याने महामार्गाची कशी दुरवस्था झाली हे दाखवले. यावरून या महामार्गातील बांधकामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली. टेंडरनामाने सर्व वृत्तमालिका गडकरींना मेलद्वारा पाठवली. अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर गडकरींच्या आदेशाने रस्त्याची दुरूस्ती हाती घेण्यात आल्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसेच खांदेशमधील धुळे, जळगाव; मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि पश्चिम महाराष्ट्रातील धाराशीव, सोलापूर या दोन जिल्ह्यांतील प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

या कंपन्या आल्या ताळ्यावर 

● आयआरबी या कंत्राटदार कंपनीने ऐडशी ते औरंगाबाद १९०.२ किमीसाठी १८७१.३४ कोटी खर्च केले होते. त्यांनी पंधरा दिवसापूर्वीच दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

● एल ॲंड टी या कंत्राटदार कंपनीने निपानी ते करोडी ३०.२१५ किमीसाठी ५१२.९९ कोटी खर्च केले होते. सदर कंपनीने देखील दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

● दिलीप बिल्डकॉन या कंत्राटदार कंपनीने करोडी ते तेलवाडी पर्यंत ५५.६१० किमीसाठी ५१२.०२ कोटी खर्च केले होते. त्यांनी देखील दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे.

कंत्राटदार कंपनीला सुनावले

औट्रम घाटानंतर महामार्गाचा शेवटचा टप्पा असलेल्या चाळीसगाव ते धुळे हाय-वेचे कलथानिया धुळे – चाळीसगाव हायवे प्रा. लि. या कंत्राटदार कंपनीकडून काम सुरू आहे. एकूण ६७.३३१ किमीसाठी एक हजार कोटीतून सद्यस्थितीत रस्ता बांधणी सुरू आहे. मात्र कंत्राटदाराच्या हालगर्जीपणामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. खोदलेल्या रस्त्यावर सावधानतेचे फलक व अन्य सुरक्षा साधने नाहीत. रस्त्यांवर पाणी मारले जात नसल्याने प्रवाशांना धूळीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. यावर देखील संबंधित विभागातील अधिकारी व ठेकेदारांला गडकरींनी सुनावल्याने विश्वसनीय सुत्रांकडून कळाले. सुरक्षा साधनांचा पुरेपूर वापर करून प्रवाशांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन तातडीने रस्ता पूर्ण करा, असे आदेशच गडकरींनी दिले आहेत. या मार्गावर काही ठिकाणी भूसंपादनाचा तिढा कायम असल्याचा मुद्दाही अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Koshyari attends Beating Retreat Ceremony on Navy Day

Mon Dec 5 , 2022
Mumbai :- Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari attended the ‘Beating Retreat’ and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy at Gateway of India in Mumbai on the occasion of Navy Day on Sun (4 Dec).Vice Admiral Ajendra Bahadur Singh, Flag Officer Commanding in Chief, Western Naval Command, Charu Singh, serving and retired officers of Indian Navy […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com