Ø हिंगणी येथे ॲग्रीस्टॅक शिबिराचे उद्घाटन
Ø विविध योजनांच्या लाभाचे वितरण
Ø अंगणवाडी, शाळा, पीएचसी, तलाठी कार्यालयाची पाहणी
नागपूर :- केंद्र शासनाच्या ॲग्रीस्टॅक या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात येत असून या फार्मर आयडीच्या माध्यमातून शेती विषयक संपूर्ण माहितीचे संकलन शासनाकडे राहणार आहे. तसेच शासनाच्या विविध येाजनांचा लाभ देण्यासाठी फार्मर आयडी उपयुक्त ठरणार आहे करिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज हिंगणी येथे आयोजित ॲग्रीस्टॅक शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.
ॲग्रीस्टॅक नोंदणी शिबिर व शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमाचे करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसिलदार मलीक विराणी, हिंगणीच्या सरपंच दामिनी डेकाटे आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने शेतक-यांसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा फार्मर आयडी उपयुक्त ठरणार आहे. नागपूर विभागात आतापर्यंत पी एम किसान योजनेच्या 14 लाख शेतकऱ्यांपैकी 10 लाख शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी झाली असल्याचे बिदरी यांनी यावेळी सांगितले. ज्या शेतकऱ्यांनी अजून नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
विभागीय आयुक्तांच्या हस्ते विविध लाभांचे वितरण
यावेळी बिदरी यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, ई-शिधापत्रक, ॲग्रीस्टॅक नोंदणी प्रमाणपत्र, प्रधानमंत्री सिंचन योजनेंतर्गत शेतकरी बचत गटांना ट्रॅक्टरची चावी देऊन वितरण व कृषी साहित्याचे वितरण तसेच ग्रामपंचायतीतील 5 टक्के दिव्यांग निधीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले.
शिबिरामध्ये लावण्यात आलेल्या ॲग्रस्टॅक नोंदणी स्टॉलला श्रीमती बिदरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला व फार्मर आयडी बाबत माहिती समजावून सांगितली.
आयुक्तांनी दिल्या विविध कार्यालयांना भेटी
राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या 7 कलमी कृती आराखड्या अंतर्गत विभागीय आयुक्त यांनी सेलू तालुक्यातील हिंगणी येथील तलाठी कार्यालय, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक केंद्र शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली व आवश्यक सूचना देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. तलाठी कार्यालयास भेट देऊन ग्राम महसूल अधिकारी राहुल खंडारे यांना फेरफार प्रलंबित राहणार नाही, ॲग्रीस्टॅकची नोंदणी 100 टक्के करण्याचे प्रयत्न करावे, यासाठी काही तांत्रिक अडचणी येत असल्यास कळवावे. महसूल वसुली 100 टक्के करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, त्याचबरोबर कार्यालयामध्ये दर्शनी भागावर फलक लावण्याच्याही सुचना यावेळी बिदरी यांनी दिल्यात. तसेच यावेळी ग्राम पंचायत कार्यालयाला सुध्दा भेट देऊन सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी यांचेशी संवाद साधून ग्रामपंचायतीच्या अडचणी जाणून घेतल्या.