नागपूर, दि. 16 : रेशीम शेतीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर मार्फत संपूर्ण जिल्हयात महारेशीम अभियान 25 नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या अभियानात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत तीन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपनगृह बांधकामासाठी मजूरी व सामुग्रीसाठी प्रतीएकर 3 लाख 32 हजार 740 रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनाची परिपूर्ण माहिती नसल्याने शेतकरी याकडे वळलेले दिसून येत नाहीत. मनरेगा योजनेंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, हा अभियानाचा उद्देश आहे. त्यानुसार शेतकरी महिला बचतगटांनी या योजनेचा लाभ घेणे अपेक्षित आहे.
या अभियानादरम्यान गावागावातून रेशीम शेतीचे महत्व, इतर पिकांचे तुलनेत मिळणारा भरघोस फायद्याचे महत्व पटवून देण्यात येत आहे. रेशीमकोषांना मिळणारा दर लक्षात घेता शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तुती लागवड करुन रेशीम पीक घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी तुती लागवडीसाठी नावनोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0712-2715507 वर किंवा 9527070791 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.