– जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे व्हिडिओ व्हायरल
गडचिरोल :- लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या विकासासाठी मतदारांनी प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान हा आपला हक्क् असला तरी आपण कर्तव्य म्हणून मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
मतदारांनी मतदान करण्याबाबत जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे आवाहन तसेच जनजागृतीपर व्हिडिओ जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात येवून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. यावेळी माझे मत माझे कर्तव्य या व्हिडीओ संदेशाचे प्रसारण प्रसंगी जिल्हाधिकारी दैने, उप जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव व गणेश बैरवार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी संजय दैने यांचा संदेश : गडचिरोली जिल्हा नेहमीच मतदानात अग्रेसर राहीला आहे. येत्या १९ एप्रिल रोजी लोकसभेच्या निवडणूकीत सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून देशातील सर्वाधिक मतदानाच्या टक्केवारीचा विक्रम गडचिरोलीच्या नावे करावा,
*जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल* : मी स्वत: 19 एप्रिल रोजी मतदान करणार आहे, तुम्हीपण निर्भयपणे मतदान करा. पोलिस प्रशासन आपल्या पाठिशी आहे, कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करा.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह : लोकशाही का पण्डुम साजरा किया ना, 19 एप्रिल दिया मतदान किया ना..उन्दी मतदानता महत्व मंता.. गोंडी भाषेतील आयुषी सिंह यांचे मतदारांना आवाहन समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकशाहीचा उत्सव साजरा करूया 19 एप्रिल रोजी मतदान करू या, आपले एक मत महत्वाचे आहे, असा संदेश त्यांनी दिला आहे.
यासोबत ‘माझे मत माझे कर्तव्य’ या संकल्पनेवर आधारित व निवडणूक आयोगाच्या ‘ये पुढे मतदान कर..’ गीतावर गणेश बैरवार यांच्या दिग्दर्शनात व बालू माने चित्रीत व्हिडिओतून मतदान करण्याबाबत संदेश प्रसारित करण्यात आला आहे.