– दिग्रस-दारव्हा-नेर तालुक्यातील २ हजार ५२५ विद्यार्थ्यांचा सहभाग
यवतमाळ :- ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रशासकीय सेवेत यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीसाठी नाव नोंदणी केलेल्या २ हजार ५२५ विद्यार्थ्यांची १०० गुणांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा उद्या रविवार, दि. २३ जून रोजी दिग्रस, दारव्हा व नेर येथे घेतली जाणार आहे. सहा केंद्रावरून ही परीक्षा होणार आहे.
दिग्रस तालुक्यातील ८११ विद्यार्थी या परीक्षेला बसले असून त्यांची लेखी परीक्षा बा.बू. कला, ना.म. वाणिज्य व बी.पी. विज्ञान महाविद्यालय या केंद्रावर (बैठक क्र. डीजी ०००१ ते डीजी ०८११) विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. दारव्हा तालुक्यात ७७९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मुंगसाजी महाविद्यालय (बैठक क्र. डीआर ०००१ ते डीआर ०३८५), शिवाजी हायस्कूल (बैठक क्र. डीआर ०३८६ ते डीआर ०६३५) आणि एडेड हायस्कूल (बैठक क्र. डीआर ०६३६ ते डीआर ०७७९) मध्ये ही परीक्षा होणार आहे. नेर तालुक्यात सर्वाधिक ९३५ विद्यार्थी परीक्षेत सहभागी होणार आहेत. त्यांची परीक्षा दि इंग्लिश हायस्कूल (बैठक क्र. एनआर ०००१ ते एनआर ०४११) व नेहरू महाविद्यालय (बैठक क्र. एनआर ०४१२ ते एनआर ०९३५) येथे होणार आहे.
रविवारी होत असलेल्या या परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता प्रवेश बंद होणार असून, सकाळी ११ ते १२ या वेळेत परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या परीक्षेद्वारे शिष्यवृत्ती योजनेसाठी निवडलेल्या पात्र विद्यार्थ्यांची यादी ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ५ जुलै रोजी या विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व विद्यावेतनाचा पहिला हप्ता वितरीत केला जाईल. त्यानंतर अमरावती येथील विदर्भ आयएएस अकॅडमी येथे ८ जुलैपासून स्पर्धा परीक्षा शिकवणीस सुरुवात होईल. अमरावती येथे निवास, भोजन व अन्य खर्च भागविण्यासाठी निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास पालकमंत्री संजय राठोड यांच्यातर्फे प्रतिमाह पाच हजार रुपयांची ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती’ देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १० महिने कालावधीचे राहणार आहे.
प्रशासकीय सेवेत ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा – संजय राठोड
ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थी क्षमता असूनही केवळ आर्थिक अडचणींमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकत नाही. स्पर्धेच्या युगात हे विद्यार्थी मागे राहू नये व प्रशासकीय सेवेत ग्रामीण विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा यासाठी ‘मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना’ सुरु करण्यात आली आहे. उद्या होणाऱ्या परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अमरावती येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.