Ø एक पेड़ माँ के नाम उपक्रम
यवतमाळ :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना कार्यान्वित करण्याबाबत जनतेला आवाहन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे आणि या पावसाळ्यात देशी जातीचे किमान एक झाड लावावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
आपल्या आईसोबत किंवा आईला अभिवादन म्हणून या पावसाळ्यामध्ये किमान देशी प्रजातीचे एक झाड लावल्यास आईसाठी ही अनमोल भेट ठरेल, असे या संकल्पनेमध्ये अभिप्रेत आहे. निसर्ग मातेचे संरक्षण करण्यासाठी आणि शाश्वत जीवनशैली निवडण्यासाठी आपण सर्व वचनबध्द आहोत.
जिल्ह्यातील सर्व विभागांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय यंत्रणा तसेच त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रातील नागरिकांना आणि कुटुंबांना या योजनेची व्यापक आणि विस्तृत माहिती देऊन प्रत्येकाने आपल्या आईसाठी कृतज्ञता म्हणून देशी प्रजातीचे एक झाड उपलब्ध जागेत लावावे आणि त्याचे संगोपन किमान 5 वर्षे करावे. याबाबत अधिकारी, कर्मचारी व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.
सर्व शासकीय यंत्रणांनी यासाठी स्वयंस्फूर्तीने कृतीशील कार्यक्रम हाती घ्यावा तसेच आवश्यक वाटल्यास रोपांच्या उपलब्धतेबाबत व तांत्रीक बाबींसंदर्भात स्थानिक वन आणि सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, यांचे सहकार्य घ्यावे. सन 2017 ते 2019 या कालावधीमध्ये ज्या झाडांची लागवड त्या त्या क्षेत्रामध्ये करण्यात आली असेल, त्यांची वाढ आणि संगोपन उत्तमरितीने होण्याबाबत सामुहिकपणे प्रयत्न करावे, असे आवाहन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.