-स्वातंत्र्याचा अमृत महोतसव अंतर्गत ‘वेब संवाद’ उपक्रम
-जिल्हा माहिती कार्यालय, महा-आयटीकडून आयोजन
नागपूर,दि.23 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात देशात आमूलाग्र बदल झाला आहे. समतेचे कल्याणकारी राज्य प्रस्थापित होण्यासाठी नागरिकांनी अधिकाराच्या जागरुकतेबरोबरच कर्तव्याच्या कक्षा रुंदावल्या पाहिजे तरच समताधिष्ठित व्यवस्था स्थापन होईल, असे मार्मिक मार्गदर्शन ज्येष्ठ साहित्यिक, कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.
अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा माहिती कार्यालय निर्मित ‘वेबचर्चा संवाद’ कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांची ‘स्वातंत्र्योत्तर भारत आणि सामाजिक समता’ या विषयावर वेबचर्चा-संवादात ते बोलत होते.
प्रशासन देश चालविण्यासाठी असते. त्यासाठी विश्वासार्हता व आत्मचिंतन या बाबींवर समतेचे राज्य प्रस्तापित करता येते. जनता व प्रशासनात विश्वासाचे नाते निर्माण होणे म्हणजेच खरी समता, आपुलकी निर्माण होणे यावर समता आधारित आहे. अनेक संस्था,धर्म, जात, पंथ तसेच प्रचंड भूभाग मिळून स्वातंत्र्य भारताची निर्मिती झाली आहे. यामध्ये नेहरु घराण्याचा त्याग महत्वपूर्ण आहे. प्रशासन चालवितांना अंमलबजावणी करणे महत्वाचेआहे. समता निर्माण करण्यासाठी समाजातील दरी नाहीशी झाली पाहिजे. यासाठी समन्वयाची खरी गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
समतेचे खरे विचार आपणास आई वडिंलांकडून जन्मजात मिळत असतात. समतेच्या दृष्टीने कायदा नगण्य आहे. कायदा अराजकतेविरुध्द असून खेडयापासून जर समतेचे विचार तयार झाले पाहिजे तरच त्याची अंमलबजावणी करणे शक्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाज घटना दिली. त्यातच समतेचे विचार अंतर्भूत आहेत, असे ते म्हणाले.
समतेचे विचार संतपंरपरेत आहेत. त्यासोबत गौतमबुध्दांनी सुध्दा समतेचे विचार समाजास दिले असून त्याविचारावरच संविधानाची घडण बाबासाहेबांनी केली. मिश्रअर्थव्यवस्थेमुळे देशाची व्यवस्था मजबूत झाली.आज टाचणीपासून विमानापर्यंत निर्मिती करणे यामुळेच शक्य झाले. आज होणारे खाजगीकरण समताधिष्ठित व्यवस्थेचे विरुध्द आहे. देशातील अर्थव्यवस्था ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यासाठी गाव तेथे उद्योग व घर तिथे रोजगार निर्माण झाले पाहिजे. प्रत्येक गावात शिक्षण व आरोग्य नि:शुल्क केल्यास समृध्द गाव होऊन समतेचे राज्य स्थापित होईल, असे ते म्हणाले.
आरक्षणामुळे समतेचे राज्य निर्माण करण्यास मदत होते. त्यासाठी समतेचे सूत्र समजावून घेणे महत्वाचे आहे. शासनाने ग्रामीण भागातील शांळाकडे लक्ष दयावे. तरच पुढील पिढीचा विकास होईल. शिक्षण, धर्म, शासनात समता निर्माण झाल्यास कल्याणकारी राज्याची निर्मिती शक्य आहे. सामाजिक समता व कल्याणकारी राज्य स्थापित करण्यासाठी विश्वार्हता व पारदर्शी विचार अत्यंत महत्वाचे आहे. समता लोकशाहीस पूरक आहे त्यातूनच नवे नेतृत्व निर्माण होईल. कायद्याआधी समता प्रस्तापित झाली पाहिजे. नागरिकांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन कर्तव्यात मागे राहू नये, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय व महाआयटी यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी जिल्हाधिकारीआर.विमला यांनी मान्यवरांचे स्वागत केले. या वेबसंवादात उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर यांचा सहभाग होता. हा कार्यक्रम यु-टयुब, वेबेक्स व फेसबुकवर लाईव्ह होता, यावेळी या विषयावरील प्रश्न चर्चेदरम्यान विचारले.