पुरे झाली ना ढोंगबाजी

🍳आरसा…@

भारतातील सर्वात जुना आणि पहिला राजकीय पक्ष काँग्रेस. पण त्याने देशाला विभाजित स्वातंत्र्य मिळण्याच्या हालचालींपासूनच देशातील बहुसंख्य हिंदू समाजाला सापत्न भावाची, दुय्यम दर्जाची वागणूक दिली, याला इतिहास साक्षी आहे. अयोध्येच्या रामलला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवरून पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्यावर टीका करणारी कॉंग्रेस ही गोष्ट सोयीस्कररीत्या विसरली की, त्यांचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू 1951 मध्ये सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण सोहळ्याला स्वत: तर गेलेच नाही. उलट, राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांनीही जाऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. (अर्थात् कणखर राजेन्द्र प्रसादांनी त्यांचा सल्ला धुडकावून सोमनाथचं लोकार्पण केलं, हा भाग वेगळा.) अशा नेहरूंपेक्षा मोदी केव्हाही चांगले. राष्ट्रपुरुष असलेल्या रामाच्या मंदिरासाठी ते प्रारंभापासूनच आघाडीवर आहेत (सोमनाथपासून सुरू झालेल्या अडवाणींच्या रामरथयात्रेचे पहिल्या टप्प्यातील सारथी मोदीच होते) आणि 22 जानेवारीला तेच राममंदिराचे डंके की चोटपे लोकार्पणही करणार आहेत.

त्यामुळे कॉंग्रेसनं या लोकार्पणावर बहिष्कार घातला आहे. त्यांची हायकमांड सोनिया गांधी, राहुल गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे, लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधुरी हे नेते 22 च्या सोहळ्याला जाणार नाहीत. तसं त्यांनी जाहीरच केलं आहे. इतर काँग्रेसजन याला आदेश मानून जाणार नाही, हेही उघड आहे. कारण, अशा गुलामीची काँग्रेसजनांना सवय आहे. नेत्याच्या मागे फरफटत जाणे त्यांच्या इतकं अंगवळणी पडलं आहे की, आता ते त्यांच्या रक्तात भिनून डीएनएत आलेलं आहे

अशी परिस्थिती असताना, उत्तर प्रदेशातील काही काँग्रेसनेत्यांनी काल अचानक अयोध्येत जाऊन शरयू नदीत डुबकी मारली हे कसं झालं ? याला म्हणतात- “डॅमेज कंट्रोल”, झालेली चूक दुरुस्त करण्याचा घाईघाईचा प्रयत्न करण्याचे नाटक. कारण, जसजशी 22 जवळ येत आहे, तसतसं देशातील वातावरण अधिकाधिक राममय होत चाललं आहे. बहुसंख्य समाज आपल्या रामविरोधी भूमिकेमुळे आपल्या हातातून निसटण्याची भीती काँग्रेसमध्ये वाढत चालली आहे. त्याचाच परिणाम म्हणून काही उत्तर प्रदेशी नेत्यांना अयोध्येला पाठविण्यात आलं असू शकतं. मुळातच राममय असलेल्या या प्रदेशातील काँग्रेस नेत्यांना आत्ताच रामललाचा आठव झाला, हा केवळ योगायोग नाही. बना बनाया खेल है सब

आणि, हा खेळ पूर्णत: राजकीय आहे. याचा पुरावा म्हणजे, हेच ‘रामभक्त काँग्रेसनेते’ नव्या राममंदिरात काँग्रेसचे झेंडे घेऊन गेले आणि दरवाजावर झेंडा लावण्याचा प्रयत्न करू लागले. साहजिकच मंदिरासमोर राडा झाला आणि इतर भाविकांनी त्यांना हुसकावून लावलं. हा काय तमाशा केला काँग्रेसने ? राम मंदिराला अपशकुन करण्याचा हा प्रयत्न होता, असं इतरांनी म्हटलं तर ? धर्माचं राजकारण करण्याचा भाजपावर आरोप करायचा अन् स्वत: पक्षाचे ध्वज घेऊन चेलेचपाटे मंदिरावर सोडायचे, ही ” डबल ढोलकी” कशासाठी ? त्यापेक्षा, मिळालेल्या निमंत्रणानुसार 22 च्या सोहळ्यात नेत्यांनी सहभागी होऊन रामभक्तांची थोडी सहानुभूती मिळवता येऊ शकते ना. अर्थात सोनिया गांधींना चालत असेल तरच

– विनोद देशमुख

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबवा - विजयलक्ष्मी बिदरी

Thu Jan 18 , 2024
Ø पार्किंगच्या प्रश्नासंदर्भात आढावा Ø अपघातमुक्त झोन तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरवणार नागपूर :- नागपूर शहरातील वाहतूकिच्या नियमांसदर्भात नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करून अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, तसेच ‘अपघातमुक्त शहर’ ही संकल्पना राबविण्याला प्राधान्य देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्यात. शहरातील पार्कींगच्या प्रश्नासंदर्भात वाहतूक पोलीस, महानगरपालीका, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांनी संयुक्तपणे उपाययोजना अंमलात आनण्याचे त्यांनी सांगितले नागपूर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com