– 29 हजार 504 ऑनलाईन अर्ज दाखल – विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई :- कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नागरीकांच्या तक्रारी, अर्ज, निवेदने देण्यासाठी तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत प्राप्त होणारे टपाल स्वीकारण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकाराने केंद्रीय नोंदणी केंद्र कार्यान्वीत करण्यात आला आहे. या केंद्राला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
कोकण विभागाच्या शासकीय कामकाजाचा केंद्रबिंदू असलेल्या कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात 15 ऑगस्ट 2023 पासून केंद्रीय नोंदणी केंद्र (Central Ragistry unit) स्थापन करण्यात आले आहे. डॉ.कल्याणकर यांच्या मार्गदर्शनातून आता टपाल सेवा ई ऑफिसच्या माध्यमातून होत आहे. या नोंदणी केंद्राच्या माध्यामातून शासकीय व्यवहार वेगवान आणि अधिक पारदर्शी करण्यासाठी ते डिजिटल करण्यात आले आहे.
केंद्रीय नोंदणीत आलेली टपालपत्रे विभागानुसार वेगळी केली जातात, त्यासाठी प्रत्येक विभागाचा वेगळा कक्ष तयार करण्यात आला आहे. केंद्रात आलेली टपालपत्रे स्कॅन करुन प्रत्येक विभागामध्ये पोहचवली जातात. त्यांची पोच संबधित अर्जदाराला मोबाईल संदेशाद्वारे पाठविला जातात. अर्जदार संबधित मॅसेजवर Online अर्जाची सदयस्थिती पाहू शकतो. या आधुनिक यंत्रणेमुळे नागरिकांच्या वेळेची व आर्थिक बचत होत असून त्यांचे हेलपाटे वाचत आहेत. अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. आतापर्यंत या नोंदणी केंद्रात 29 हजार 504 अर्ज ऑनलाईन स्विकारण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या या नाविण्यपूर्ण प्रकल्पाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.