बांबू व टसर सिल्क पासून तयार साडीला प्रथम पुरस्कार
नागपूर :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या विभागीय हातमाग कापड स्पर्धेत नागपूर येथील विणकर नामदेव लिखार यांच्या टसर सिल्क आणि बांबू यांसारख्या नैसर्गिक तंतूंचा वापर करून तयार केलेल्या नाविण्यपूर्ण साडीला प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मोहाडीचे गंगाधर गोखले यांनी विणलेल्या साडीला आणि नागपूरचेच नासिर शेख यांनी विणलेल्या चिंधी कारपेटला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी आज जाहीर केला.
विभागीय आयुक्त कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात हातमाग कापड स्पर्धा 2022-23 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त पी. शिवाशंकर, प्रादेशिक उपआयुक्त सीमा पांडे, सहायक आयुक्त गंगाधर गजभिये, विणकर सेवा केंद्राचे उपसंचालक संदीप ठुंबरीकर, शासकीय तंत्रनिकेतनच्या वस्रोद्योग विभागाचे विभाग प्रमुख शरद गायकवाड, विशेष निमंत्रित प्रा. डॉ. राजश्री बापट उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. बिदरी म्हणाल्या, हातमागाच्या पारंपरिक कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हातमाग उत्पादनांच्या मार्केटिंगसाठी या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायीक डिझायनरचे सहकार्य घेण्याच्या सूचना दिल्या. या अद्वितीय हातमाग निर्मितीबद्दल विभागीय आयुक्त यांनी स्पर्धेत सहभागी विणकरांची प्रशंसा केली. तत्पुर्वी त्यांनी सर्व स्पर्धकांतर्फे सादर वस्रांची पाहणी करून त्यातील बारकावे जाणून घेतले.
वस्त्रोद्योग आयुक्त पी. शिवाशंकर यांनी हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ट हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना गौरविण्यासाठी व विणकरांच्या रोजगारात वाढ व्हावी या हेतुने दरवर्षी हातमाग कापड स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. हातमाग विणकरांनी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.