संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कर्मवीर ॲड. दादासाहेब कुंभारे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, कामठी व कॉलेज ऑफ सोशल वर्क, कामठी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार कौशल्य विकास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ओगावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखा कुंभारे होत्या. बीजभाषक म्हणून रा. तु. म. नागपूर विद्यापीठाची माजी कुलसचिव व कॉलेज ऑफ सोशल वर्क कामठीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांची उपस्थिती लाभली होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर अनिल पाटील तसेच एमएसएमई- डीएफओ चे सहाय्यक निदेशक सुभाष इंगेवार, भुरले यांची उपस्थिती लाभली होती डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून कार्यशाळेला सुरुवात झाली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना ॲड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, दादासाहेब कुंभारे यांनी बिडी कामगार तसेच देशातील सर्वच क्षेत्रातील कामगारांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण आयुष्यभर लढा देऊन कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार प्राप्त करून दिले. आज शासनाकडून कामगारांना ज्या सोयीसवलती व सुविधा दिल्या जात आहेत हे दादासाहेब कुंभारे यांच्या प्रदीर्घ लढायचे यश आहे. या कार्यामुळे दादासाहेब कुंभारे सर्व श्रमिकांचे हृदयसम्राट झाले. सद्यःस्थितीत बेरोजगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. तरुणांनी त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाचे व कौशल्याचे प्रत्यक्ष उपयोजन करून स्वतःचे रोजगार व उद्योग उभे केले पाहिजेत. रोजगार व उद्योगाच्या निर्मितीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सर्वंकष माहिती देण्यासाठी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या १०२ व्या जयंतीचे निमित्त साधून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. पुरणचंद्र मेश्राम म्हणाले, ॲड. दादासाहेब कुंभारे यांनी विविध आंदोलने व उपोषणाच्या माध्यमातून देशातील तमाम गरीब कामगार-श्रमिकांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आंबेडकरी व रिपब्लिकन चळवळीचे ते सच्चे ध्वजवाहक होते. आजच्या युवकांनी नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे कसे होता येईल, याचा विचार केला पाहिजे. चीन-जपानप्रमाणे आपल्याही देशातील ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट झाली पाहिजे. याकरिता तरुणांनी आता जागतिक बाजारपेठेत विकल्या जाईल अशा मालाचे उद्योग सुरू केले पाहिजेत. परदेशात जाऊन आपले ज्ञान विकण्यापेक्षा आपल्या ज्ञानाच्या बळावर आपल्या देशातच मोठमोठे उद्योग उभारून देशाला मजबूत केले पाहिजे, असे ते म्हणाले.
सुभाष इंगेवार यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग उभारण्यासंबंधी माहिती दिली. बारकोड, प्रॉडक्ट निर्माण करणे, पेटंट घेणे इत्यादी संदर्भातील सविस्तर माहिती दिली. अनिल पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगारासाठी कशाप्रकारे भांडवल पुरविले जाते, शासनाची सबसिडी, शिक्षणाानुसार उद्योगधंद्यासाठी दिले जाणारे भांडवल, शेडच्या व्यवस्थेकरता दिले जाणारे पुरवणी भांडवल, उद्योगासाठी अर्ज करण्याची पद्धती याबाबत सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन केले. प्रस्तुत कार्यशाळेचा बीएसडब्ल्यू, एमएसडब्ल्यू व आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
संचालक डॉ. राष्ट्रपाल मेश्राम यांनी केले तर आभार डॉ. गिरीश आत्राम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दादासाहेब कुंभारे मल्टीपर्पज ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य सागर भावे, शोयब खान, निखिल शेरकर, महंमद रेहान, संदीप शेरकर, हर्षल कुंभारे कॉलेज ऑफ सोशल वर्क कामठीचे डॉ. राष्ट्रपाल मेश्राम डॉ. गिरीश आत्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.