पुणे :- केंद्रातील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या नवीन सहकार धोरणाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला समृध्द करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्याकडील दोन्ही खात्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या देखील खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न राहतील असे स्पष्ट केले .
नवीन सहकार धोरण लवकरच जाहीर होणार असून देशभरातील छोट्या घटकांपर्यंत त्याचा लाभ पोहचावा आणि सहकार चळवळ अधिक सक्षम व्हावी यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मोहोळ म्हणाले .
पुण्याजवळील पुरंदर विमानतळ , लोहगाव विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार आणि नवी मुंबई विमानतळ याकडे आपण प्राधान्याने लक्ष देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी आज सकाळी मोहोळ यांचे पुण्यात आगमन झाले . केंद्रात राज्यमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आल्याने त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. विमान तळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.