11 हजार 971 कोटींचे कर्ज वितरीत
नागपूर :- शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या सर्व योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यावर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी केले.
कस्तुरचंद पार्कजवळील परवाना भवन येथे कर्ज मेळावा (क्रेडिट आऊटरीच) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पुढे बोलताना कराड म्हणाले, केंद्र शासनाच्या लाभार्थी केंद्रीत विविध योजनांतर्गत 11 हजार 971 कोटी रूपयांचे कर्ज लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले आहेत.
जनतेला मदत करण्यासाठी प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, जीवन ज्योती योजना, अटल पेंशन योजना, पीएम स्वनिधी योजनांसारख्या विविध योजनांमध्ये लाभ दिल्या जात आहे. लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
विविध सरकारी योजनांचा आढावा कराड यांनी यावेळी घेतला. योजनांचा विस्तार विदर्भातील दुर्गम भागात करण्याचे निर्देष त्यांनी बँकांना दिले. नागपूर जिल्ह्यामध्ये विविध योजनांच्या 238 लाभार्थ्यांना 21 कोटी 43 लाख रूपयांचे मंजूर पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी आभार जिल्हा व्यवस्थापक मोहित गेडाम यांनी मानले.