टास्क फोर्सच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा
नागपूर : नागपूर महानगरपालिका अंतर्गत हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे हत्तीरोग जनजागृती अंतर्गत २५ मे २०२२ ते ५ जून २०२२ दरम्यान शहरात हत्तीरोग दुरीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत मनपाची आरोग्य चमू घरोघरी जाऊन पात्र सर्व व्यक्तींना गोळ्या वाटप करणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी (ता.२०) अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी टास्क फोर्सच्या बैठकीत हत्तीरोग दुरीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्व नागरिकांनी मनपाच्या आरोग्य चमूकडून गोळ्यांचे सेवन करून हत्तीरोग दुरीकरण करण्यासाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
शुक्रवारी (ता. २०) हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची रूपरेषा ठरविण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीमधील आयुक्तांच्या सभाकक्षात टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, सहायक संचालक डॉ. निमगडे, जागतिक आरोग्य संस्थेच्या विभागीय अधिकारी डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मिन मुलानी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी किटकजन्य आजाराबाबात माहिती देण्यात आली. समोर येणा-या पारेषण काळात विभागातील कर्मचा-यांनी कसे काम करावे तसेच १ ते ५ झोनमध्ये आय.डी.ए. कार्यक्रम कसा राबवावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत वाटण्यात येणाऱ्या गोळ्या प्रत्यक्ष त्यांच्यासमोर खाऊन मोहिम यशस्वी करण्याकरिता जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे करण्यात आले आहे.