– मनपाच्या बाईक रॅलीदरम्यान मतदारांनी दिली मतदानाची ग्वाही
नागपूर :- भारतीय संविधानाने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, तरी देखील नागरिक मतदानासाठी उदासीन असल्याचे दिसून येते, वर्ष २०१९ मध्ये नागपुरातील ज्या भागांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी होती, अशा ‘कमी मतदान क्षेत्र आणि मोठ्या रहिवासी इमारतीसह शहरातील विविध भागांमध्ये मतदार जनजागृतीसाठी स्वीप कार्यक्रम अंतर्गत सोमवारी (ता.८) बाईक रॅली काढण्यात आली. “होय! मी मतदान नक्की करणार”, तसेच इतरांना देखील मतदानासाठी प्रोत्साहित करणार असा संकल्प मतदारांनी रॅलीदरम्यान केला.
नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बाईक रॅलीच्या माध्यमातून हजारो बाईकस्वारांनी मतदानाचा जागर करीत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बाईक रॅलीदरम्यान मतदारांनी मतदान करण्याची ग्वाही दिली.
मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या आवारातून प्रारंभ झालेल्या बाईक रॅलीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः बाईक चालवीत मतदारांनी अधिकाधिक संख्येत मतदान करीत नागपूरला प्राविण्यासह अर्थात ७५ टक्के डिस्टिंग्शनसह पास करावे असे आवाहन केले. याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त महेश धामेचा, घनश्याम पंधरे, नरेंद्र बावनकर, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, मनोज तालेवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता दूत(सफाई कर्मचारी) यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मनपाच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये यांनी “मनपाच्या मतदार जनजागृती बाईक रॅली” ला हिरवी झेंडी दाखविली.
“मतदार जनजागृती” व “नागपूर नक्की पास होणार” असे फलक हाती घेऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतोच्या आवारातून प्रारंभ झालेली बाईक रॅली लीबर्टी सिनेमा थिएटर चौक होत छावणी चौक, जुना काटोल नाका चौक, राज नगर सेमिनरी हिल्स चौक, लेडीज क्लब चौक, जीएस कॉलेज चौक, शंकर नगर चौक, झांशी राणी चौक, आनंद सिनेमा थिएटर, नवीन लोहपूल अंडर पास होत मोक्षधाम घाट चौक, सरदार पटेल चौक, जठतरोडी बारा सिग्नल चौक, मेडिकल चौक, क्रीडा स्क्वेअर, सोमवारी क्वार्टर, सक्करदरा चौक, तिरंगा चौक, मंगलमूर्ती लॉन चौक, गंगाबाई घाट चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक, बडकस चौक, अग्रसेन चौक, मेयो हॉस्पिटल चौक (सी ए रोड), संविधान चौक होत मनपा मुख्यालयात परतली व येथे बाईक रॅलीची सांगता झाली.
बाईक रॅली दरम्यान मार्गावरील कँपिटल हाइट्स, रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन्स (RWA), बाजारपेठ, मोठे चौक, वर्ष २०१९ मध्ये कमी प्रमाणात मतदान झालेले क्षेत्र, महाविद्यालय, बँक, अशा ठिकाणी थांबून देशाचे भवितव्य घडविण्याची ताकद एका मता मध्ये आहे. त्यामुळे मतदान नक्की करा, मतदानाला दिवशी सुट्टीचा दिवस म्हणून न बघता, आपल्या बूथ वर जाऊन मतदान करा असे आवाहन करण्यात आले. मनपाच्या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्स्फूर्त साथ दिली, “आम्ही मतदान नक्की करणार” असा संकल्प मतदारांनी यावेळी केला.
रिमझिम पावसाने वाढविला उत्साह
मतदार जनजागृती बाईक रॅली दरम्यान मार्गावर रिमझिम पावसाने हजेरी लावली. तरी पावसाची तमा न बाळगता, बाईकस्वारांनी आपल्या उत्साहात कमी येऊ दिली नाही. बाईक रॅली न थांबिता शहराची भ्रमंती करीत जनजागृती केली.