वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी प्रयत्न करणार – वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

– ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते नामवंत खेळाडूंचा सत्कार

– जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्र विकासाला प्राधान्य ; चंद्रपूरच्या धर्तीवर वर्धा येथे सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक उभारणार

वर्धा :- आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. त्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे केवळ तीनच सिंथेटिक स्मार्ट ट्रॅक आहेत. हे तिन्ही ट्रॅक चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. आता त्याच धर्तीवर वर्धा जिल्ह्यात ट्रॅक तयार करण्यात येतील, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

विकास भवन येथे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने नामवंत खेळाडूंच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुनील गफाट, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील प्रत्येक खेळाडूने त्या आवडीच्या क्रीडा प्रकारात नावलौकिक मिळविला पाहिजे. त्यादृष्टीने त्यांना आवश्यक सोयीसुविधा देण्याकरीता शासन त्यांच्या पाठीशी आहे, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांबद्दल सांगताना ते म्हणाले, ‘तरुणांसाठी रोजगाराच्या योजनांसह शेतकऱ्यांसाठी सुद्धा विविध योजना राबविल्या जात आहेत. माझी कन्या भाग्यश्री, निराधार योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गोरगरिबांना घरकुल उपलब्ध व्हावे यासाठी ओबीसी घटकाकरिता घरकुल योजना सुरु करण्यात आली आहे.’ भारत पाकिस्तान सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून महाराजांची वाघनखे लंडनवरुन आणण्यात येत असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

यावेळी खासदार रामदास तडस यांनीही विचार मांडले. ते म्हणाले, ‘खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये संधी देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. नोकरीमध्ये संधी दिल्यानंतर या नामवंत खेळाडूंना आशियाई व ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये नशीब आजमावण्यासाठी किमान तीन वर्षे संधी मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कुस्ती प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामुळे राज्यातील कुस्तीपटूंना मोठा लाभ मिळणार आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. भोयर यांनी केले. वर्धेतील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविणे ही अभिमानाची बाब आहे. तालुकास्तरावर क्रीडा संकुल तयार केल्यामुळे जिल्ह्यात आंतराष्ट्रीय खेळाडू तयार होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार भोयर यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिम महिला अन्याय विरोधात संघर्ष करतील

Thu Oct 19 , 2023
– विधानसभेवर मोर्चासाठी महिलांचे जन -जागृती अभियान सुरु  नागपूर :- आदिम हलबा,हलबी जमातीच्या महिलांची जन -जागृती सभा राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने आदिवासी हलबा सांस्कृतिक सभागृह पांचपावली ,नागपूर येथे संपन्न झाली. सुरवातीला थोर महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज ,बिरसा मुंडा यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून समाजसेवक दे.बा. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com