– शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाचा समारोप रविवारी
नागपूर :- विदर्भाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासींचे जीवन आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने सुसह्य करणे आणि एकलव्य एकल विद्यालयाच्या माध्यमातून आदिवासींना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणे यासाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्था गेली तीन दशके सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) पत्रकार परिषदेत सांगितले.
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात सुरू असलेल्या शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गाची माहिती देताना ना.नितीन गडकरी बोलत होते. यामध्ये १०१६ शिक्षक आणि १२४ पर्यवेक्षक अशी एकूण १ हजार १४० मंडळी सहभागी झाली आहे. २७ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजता प्रशिक्षण वर्गाचा समारोपीय सोहळा होणार आहे. संस्थेच्या कार्याची माहिती देताना ना. गडकरी म्हणाले, ‘गेल्या २७ वर्षांपासून कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्था सातत्याने आदिवासी भागामध्ये काम करत आहे. आदिवासींना शैक्षणिक, सामाजिक तसेच आरोग्य व रोजगाराच्या संदर्भात मार्गदर्शन करीत आहे.याच मालिकेत एकलव्य एकल विद्यालय कार्य करीत आहे.
ज्या गावांमध्ये एकल विद्यालय स्थापन झाले तिथे शिक्षणाप्रती आवड निर्माण करण्यात यश आले आहे. त्यामुळे तिथे शाळा सोडण्याचे प्रमाणही शुन्य झाले आहे.’ कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेने कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची माहितीही ना. गडकरी यांनी दिली. पत्रकार परिषदेला संस्थेचे सचिव राजीव हडप, कोषाध्यक्ष अतुल मोहरीर, सदस्य धनंजय बापट, सुधीर दिवे, एग्रोव्हिजन फाउंडेशनचे सचिव डॉ. सी.डी. मायी यांची उपस्थिती होती.
रजत शर्मा यांची उपस्थिती
दरवर्षी आयोजित होणाऱ्या प्रशिक्षण वर्गात समाजातील प्रसिद्ध आणि यशस्वी व्यक्ती मार्गदर्शनासाठी येतात. आजवर भैय्याजी जोषी, नाना पाटेकर, सतपाल महारज (उत्तराखंड), गिरीष कुबेर, राजे अमरिषराव आत्राम, डॉ. राणी अभय बंग, डॉ. निशिगंधा वाड आणि अभिनेत्री प्रिती झिंटा या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन करण्यासाठी येऊन गेलेले आहेत. यंदा २७ ऑगस्टला होणाऱ्या समारोपीय सोहळ्यात इंडिया टीव्हीचे एडिटर-इन-चीफ तसेच चेअरमन रजत शर्मा विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. तर अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ पिठाचे पिठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज यांची प्रमुख उपस्थिती असेल.
एकलव्य एकल विद्यालयाविषयी…
कै. लक्ष्मणराव मानकर स्मृति संस्थेच्या वतीने विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील १०१६ गावांमध्ये एकलव्य एकल विद्यालयाचे संचालन केले जाते. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया मजबूत करणे, अक्षर ओळख, खेळ, व्यायाम, संस्कृतीचे ज्ञान, देशभक्ती आदींबाबत एकल विद्यालय काम करते.