नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत आश्रम शाळातील विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत गुणवंतांचा सत्कार
नागपूर : विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे असे स्पष्ट केले आहे. त्याचे वस्तूनिष्ठ उदाहरण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रम शाळा आहे. शिक्षणामुळे जीवन बदलते हे या आश्रम शाळांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे उद्याच्या डिजिटल क्रांतीला सिद्ध होण्यासाठी या विभागाच्या टॅब वाटपाचा वितरण सोहळा अतिशय नावीन्यपूर्ण असून त्याचे निकाल भवीष्यात बघायला मिळतील, असा आशावाद राज्याचे ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी व्यक्त केला.
नागपूर विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत नागपूर रविभवन येथे आयोजित वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी आर. विमला, आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे अध्यक्ष दिनेश सेराम,प्रकल्प अधिकारी अशोक वाहने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आश्रम शाळांचे विद्यार्थी, शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्याचे युग हे ज्ञानाचे युग आहे. उद्याच्या जगाचे नेतृत्व ज्या देशाकडे ज्ञानसंपन्न पिढी असेल तो देश करणार आहे. त्यामुळे काळाची पाऊले ओळखून डिजिटल क्रांतीसाठी तुम्ही एका पिढीला सिद्ध करत आहात. कोरोना काळामध्ये 32 कोटी विद्यार्थी डिजिटल क्रांतीचे लाभार्थी होते.या महामारीने शिक्षण क्षेत्राची दिशा बदलून टाकली आहे. त्यामुळे या प्रकारचा नाविन्यपूर्ण विचार करणार्या सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानसागर टॅबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. याचा योग्य वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा सन्मानपूर्वक उल्लेख करताना त्यांच्या सारख्या द्रष्टया नेत्यामुळे आजची डिजिटल क्रांती उभी राहू शकली याबाबत आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे, असे स्पष्ट केले. महामारीने घरातून अभ्यास कसा करावा हे सिद्ध केले आहे. त्यामुळे ई-लर्निंगच्या सकारात्मकतेचा अभ्यास तज्ञांनी, शिक्षकांनी करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांनी ज्याची इच्छा आहे. त्याला शिक्षण देण्यासाठी ई लर्निंग हे मोठे व्यासपीठ सध्या उपलब्ध आहे. डिजिटल लर्निंगचे फायदे व तोटे देखील आहेत. त्यामुळे डिजिटल व्यासपीठासोबतच वाचन, लिखाण आणि सामान्य गणिताचा अभ्यास कोणत्याही क्षेत्रातील करिअर बनवण्यासाठी उपयोगी पडते.त्याकडे लक्ष वेधण्याचा आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रकल्प संचालक अशोक वहाने यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात अब्राहम लिंकन यांनी शिक्षकाला लिहिलेल्या पत्राची अपेक्षा शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी, ज्ञानदान करणार्या शिक्षकांनी लक्षात घ्यावी, असे आवाहन केले. आदिवासी हे मूळ निवासी असून तीरकमठा ते टॅबपर्यंतचा त्यांचा प्रवास झाला आहे. आता सॅटेलाईट पर्यंत जायचे आहे. आपला रोड मॅप तयार ठेवा,असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी दिनेश सेराम यांनी देखील संबोधित केले कार्यक्रमाचे संचालन शिल्पा खुळे, धनश्री परतती यांनी केले. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या टॅबवरील अभ्यासक्रमाची माहिती व नियोजनाचे सादरीकरण डॉ करिष्मा कांबे यांनी केले. आभार प्रदर्शन भोंगाडे यांनी केले.