नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातर्फे मंगळवार, दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ द रुपी’ या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी भारतीय समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्राबद्दल मौलिक विचारांचे पुनरावलोकन केले. त्यावर आधारित अर्थचक्र प्रवर्तन ही काळाची गरज असल्याची मांडणी केली.
सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी बालू वनकर तसेच विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन विभागातील प्रकल्प अधिकारी डॉ. अमित झपाटे उपस्थित होते त्यांनी आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौद्रीक विचार आणि आजच्या काळातील त्याची उपयोगिता व समर्पकता यावर आपले विचार प्रकट केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते समाजशास्त्र विभागातील समाजकार्य विषयात आचार्य पदवी संपादन करणाऱ्या प्राध्यापिका डॉ. पूनम निमजे आणि डॉ. राजश्री रामटेके यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अशोक बोरकर यांनी केले. प्रास्ताविक नीता जगताप आणि आभार आम्रपाली कांबळे यांनी मानले. या कार्यक्रमास विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.