संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 24 :- आपल्याकडे ‘वाचाल तर वाचाल’अशी म्हण प्रचलित आहे.यानुसार कामठी नगर परिषद तर्फे हुतात्मा स्मारक येथे मागील काही वर्षांपूर्वीपासून सार्वजनिक वाचनालय कार्यरत होते.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामठी नगर परिषद तर्फे सदर हुतात्मा स्मारक येथे कोरोना तपासणी व लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते मात्र आजच्या स्थितीत कोरोनाचा प्रदूर्भाव संपला असून सर्वसामान्य स्थिती असून प्रशासनातर्फे निर्बंध सुद्धा उठविले आहेत मात्र या हुतात्मा स्मारक येथे कोरोना लसीकरण व तपासणी केंद्राचे साहित्य अजूनही ‘जैसे थे’स्थितीत असल्याने मागील दोन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या या सार्वजनिक वाचनालयाकडे कुणीही लक्ष पुरविले नाही .परिणामी आजच्या आधुनिक युगातील नवतरुण मंडळी तसेच सर्वसामान्य नागरिकांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे.परिणामी वाचन संस्कृतीच संकटात आणण्याचे कार्य कामठी नगर परिषद प्रशासन करीत आहे.तसेच येथील शहरवासीयांना वाचन संस्कृती पासून दूर ठेवून ‘वाचाल तर वाचाल’या प्रचलित म्हणी ला हरताळ फासल्याचे चित्र या कुलूपबंद हुतात्मा स्मारक वाचनालयातून दिसून येते.
आजचे तरुण मंडळी सोशल मीडियावरील जुजबी वाचन करीत असल्याने ते भरकटण्याची शक्यता बळावली आहे. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत महत्वाचे आहे.मात्र या बंद वाचनालया मुळे येथील वाचक वर्ग हा सर्वाधिक काळ मोबाईलवर तसेच दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात तेव्हा येथील वाचन संस्कृती कायम ठेवण्यासाठी हुतात्मा स्मारक येथील बंद वाचनालय पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी येथील सदभावना ग्रुप चे सुनील बडोले, प्रमोद खोब्रागडे, प्रा.फिरोज हैदर, राकेश कनोजिया, सुनील चहांदे, अविनाश भांगे, नरेश फुलझेले , प्रमोद रंगारी, यासिन भाई, सलीम भाई, सज्जाक शेख, आसाराम हलमारे, नागसेन गजभिये, गीतेश सुखदेवें, आशिष मेश्राम, आदींनी केली आहे.
कामठी नगर परिषद च्या दुर्लक्षामुळे वाचक जाताहेत वाचन संस्कृतीपासून दूर
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com