डॉ. गजानन शेपाळ यांच्या ‘रंगसभा’ ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

– ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी

– केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

मुंबई :- नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी दिले. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या ‘रंगसभा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे व या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी. राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू, असेही राज्यपालांनी सांगितले.

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजेत. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात व अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.

प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. संतोष क्षीरसागर तसेच कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्यास मान्यता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

Sun Aug 20 , 2023
मुंबई :- शासकीय व गावठाण जमिनीवर कातकरी व्यक्तींनी घरठाणाबाबतची केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे ठाण्यातील कातकरी कुटुंबांना दिलासा मिळणार असून कातकरी समाजाच्या हितासाठी राज्य शासन कटीबद्ध असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले. ठाणे जिल्ह्यात गावठाण जमिनीवरील कातकरी समाजाच्या घरठाणाबाबतची १ हजार ४३३ अतिक्रमणे, शासकीय जमिनीवरील ४७२ अतिक्रमणे जिल्हाधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून तसेच मुंबई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!