– रुपा बोधी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास आपले जीवन उन्नत होऊ शकते- रुपा बोधी
नागपूर :- आंबेडकरवादी महिला संघ ग्रूप तसेच आंबेडकराईट वूमन्स हेल्प ग्रूप तर्फे जागतिक महिला दिवस तसेच महाड संगर दिवसाचे औचित्य साधून वैचारीक कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जेष्ठ आंबेडकरी विचारक, विदर्भ मोलकरीण संघटनेच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्ता रूपा बोधी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपले विचार व्यक्त करतांना रूपा म्हणाल्या, समाजात जे बदल घडून येतात ते कृतीतून घडून येतात. सामाजिक ओढ असली की त्यातून सामाजिक परिवर्तन घडून येत असते. तथागत बुध्द तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालल्यास आपले जीवन उन्नत होऊ शकते. चळवळीच्या काळातील काही घटनांना त्यांनी उजाळा दिला. यासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या डॉ भुवनेश्वरी मेहरे, डॉ शांता गवई तसेच साहित्यिका सुजाता लोखंडे यांनाही ग्रूप च्या वतीने सन्मानित करण्यात आले. तीनही सन्मानित वक्त्यांनी प्रबोधनात्मक मार्गदर्शक केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ पुनम ढाले आपले विचार व्यक्त करतांना म्हणाल्या,मानवी मूल्य प्रस्थापित करण्यासाठी महाडचा सत्याग्रह झाला. संपूर्ण जगात स्त्रीला दुय्यम वागणूक मिळत असली तरी बौध्द धम्मा मध्ये स्त्रीला समानतेची वागणूक मिळत असते हेच समानतेच क्रांतीसूत्र डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात सम्मिलित केले आहे. प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असलेले डाॅ धनराज डहाट आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकरांशिवाय मानवमुक्तीला पर्याय नाही. संपूर्ण मानवमुक्तीचा मार्ग हा बुध्द तत्वज्ञान आणि भारतीय संविधानात संमिलित आहे.
स्त्री रोगतज्ञ डाॅ दिप्ती किरतकर यांनी स्त्रीयांच्या मनोवृतिची मानसशास्त्रीय चिकित्सा केली.
कार्यक्रमात सुरूवातीला सामूहिक बुध्दवंदना घेण्यात आली. त्यानंतर संविधान प्रास्ताविकेचे वाचन ऍड. सुमित्रा निकोसे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला गणवीर यांनी केले. सन्माननीय पाहूण्यांचा परिचय प्रज्ञा बाली, जयश्री गणवीर, सविताताई धामगाये, प्रतिभा सहारे, डॉ योगिता बनसोड तसेच अनिता बनकर यांनी दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता सातारडे यांनी केले तर आभारप्रदर्शन दीपाली दीप यांनी केले. गायत्री नारनवरे, तक्षशिला वाघधरे, छाया खोब्रागडे, रंजना वासे, भारती सहारे, इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.