मुंबई :- निवडणूक आली की खटाखट खोटी आश्वासने देण्याची काँग्रेसला सवयच आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली कोणतीच आश्वासने त्यांचे सरकार असलेल्या राज्यांमध्ये पाळली नसल्याने महाविनाश आघाडीवर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्यातील मतदारांना केले आहे. भाजपा मीडिया सेंटर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते.भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये,भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते. वक्फ बाबत महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.
जावडेकर यांनी सांगितले की,काँग्रेस हा केवळ खोटी आश्वासने देणारा पक्ष आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसने 300 युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले होते. तिथे तर विजेचा पत्ता नाही. एक लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे कबूल केले होते. तिथे राज्य सरकारची नोकर भरतीच बंद झाली आहे. जुनी पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते तिथे पगारही वेळेवर मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. कर्नाटक मध्येही तीच स्थिती आहे. दुधाला अनुदान देऊ सांगितले तर तिथे दुधाचे भाव वाढवून ठेवले.दोन वर्षांत पाण्याची स्थिती सुधारू म्हणाले तर तिथे पाणीच नसल्याने टँकर माफियाराज सुरू आहे. तेलंगणातही एकाही आश्वासनाचे पालन केले नाही.
काँग्रेसच्या संविधान,आरक्षणाबाबतच्या प्रचाराचा जावडेकर यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले की, संविधान मोडण्याचे काम काँग्रेसनेच 1975 साली केले. संविधानाची तोडफोड करणाऱ्या काँग्रेस विरोधात त्यावेळच्या जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच लढा उभारला होता, असे नमूद करून श्री.जावडेकर म्हणाले की आणीबाणीला विरोध केल्यामुळे एक लाख 20 हजार लोकांना काँग्रेस सरकारने तुरुंगात डांबले. यापैकी 80 हजार संघ परिवारातील होते.
‘वक्फ’ बोर्डाला देण्यात आलेल्या प्रचंड अधिकारांमुळे या बोर्डाला आक्षेप घेण्यात येत आहेत, हे सामान्य माणसाने समजून घेतले पाहिजे. वक्फ बोर्ड ज्या जमिनीवर अधिकार सांगेल ती जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होते. त्या जागेच्या मालकाला ‘वक्फ’ च्या जमीन विषयक दाव्याला न्यायालयातही दाद मागता येत नाही, केवळ ‘वक्फ’ बोर्डाच्या लवादासमोरच दाद मागता येते.त्याबाबत मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केल्याचे जावडेकर यांनी नमूद केले. केरळमध्ये वक्फने 600 ख्रिस्ती लोकांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. अशा वक्फला साथ देत काँग्रेस आणि त्यांच्या आघाडीतील घटक पक्ष याबाबतच्या विधेयकाला विरोध करत असल्याने नागरिकांनी याचा विचार करावा, असे जावडेकर यावेळी म्हणाले.