फसव्या संदेशाला बळी पडू नका; अन्यथा बॅंक खाते होईल रिकामे

नागपूर :- अनोळखी क्रमांकावरून वीजबिल भरण्यासंदर्भातील येणाऱ्या फ़सव्या संदेशाला बळी पडू नये आणि वीज ग्राहकांना लुटणाऱ्या सायबर स्कॅमरपासून सावध राहण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. महावितरणने कंपनीच्या वेबसाईटवर तसेच महावितरणच्या अॅपवर फेक मेसेजद्वारे होणारी फसवणूक कशी रोखता येईल याची माहिती दिली आहे.

तुमचे वीज बिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री 9.30 वाजता तुमचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. याकरिता ताबडतोब सोबत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट मेसेज नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. यात वीज बिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून बँक खात्यातील रक्कम लंपास होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वीजग्राहकांनी अशा बनावट मेसेजकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीजग्राहकांनाच सिस्टमद्वारे पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीजबिलांची रक्कम, स्वतःहून मीटर रीडिंग पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर रीडिंग घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीजबिलाची रक्कम देय दिनांक, वीजपुरवठा खंडित करण्याची रीतसर नोटीस आदींची माहिती एसएमएसद्वारे पाठविण्यात येते. तसेच अधिकृत मेसेजमधून वीजग्राहकांना किंवा नागरिकांना महावितरणच्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक मोबाइलवर संपर्क करण्याबाबत कळवत नाही. वीज बिलाबाबत काही शंका व तक्रारी असल्यास किंवा याबाबत काही एसएमएस आल्यास वीजग्राहकांनी 24 तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांक किया नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

सतर्क राहा; फसवणूक टाळा:

· महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही

· महावितरण केवळ VM-MSEDCL/VK-MSEDCL/AM-MSEDCL/JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून एसएमएस व व्हॉट्सअॅप मेसेज, इ-मेल पाठविण्यात येत नाहीत.

· (SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)

· बिलाच्या पेमेंटसाठी लिक किंवा कोणतेही सॉफ्टवेअर डाउनलोड करू नये.

· मेसेजमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू नये.

· ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका. ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल https://cybercrime.gov.in वर किंवा 1930 या क्रमांकावरील नागरिक आर्थिक फ़सवणूक पोर्टलवर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.

· अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक 1912/19120/1800-212-3435/1800-233 या अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात.

– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,

महावितरण, नागपूर

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor meets officials of State Branch of Indian Red Cross

Wed Oct 4 , 2023
Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais, in his capacity as the State President of the Indian Red Cross Society met officials of the State Branch of the Society at Raj Bhavan Mumbai on Tue (3 Oct) Chairman of the State Branch Homi Khusrokhan, Vice Chairman Suresh Deora and members of district branches of Red Cross Society were present. Addressing the […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com