– विकासकामात अडथळा ठरणाऱ्या हेरिटेज वृक्षांची मनपा आयुक्तांनी केली पाहणी
नागपूर :- अजनी रेल्वे परिसरात नवीन पार्किंग आणि विविध प्रस्तावित बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या विविध प्रजातीच्या झाडांची नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता. २५) रेल भूमी विकास प्राधिकरण, वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य आणि स्वच्छ असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत पाहणी केली. यावेळी त्यांनी विकास कामात अडथळा निर्माण करणाऱ्या हेरिटेज वृक्षांची कापणी करण्याऐवजी त्यांचे संरक्षण करण्याचे स्पष्ट निर्देश रेल भूमी विकास प्राधिकरणला दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, रेल भूमी विकास प्राधिकरणचे मुख्य प्रकल्प अधिकारी पवन पाटील, बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या सहायक वनसंरक्षक सारिका खोत आणि स्वच्छ असोसिएशनच्या अनुसया काळे छाबरानी उपस्थित होते.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी समग्र विकासाचा दृष्टिकोन ठेवून विकास करण्यात यावा आणि मोठ्या वृक्षांची कापणी करू नये, अशी सूचनाही रेल भूमी विकास प्राधिकरणला दिली. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत अजनी रेल्वे स्टेशन येथे सुरु असलेल्या विकास कामाची पाहणी केली तसेच अजनी रेल्वे कॉलनी येथे सुरु असलेल्या बांधकामात अडथळे निर्माण करणाऱ्या झाडांची पाहणी केली. रेल्वे स्टेशन येथे पश्चिम आणि पूर्व भागातील सांडपाणी प्रक्रिया संयंत्र (एसटीपी), पार्किंग आणि फूट ओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच पूर्व दिशेला एका इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
मनपा आयुक्तांनी रस्ता आणि पार्किंगच्या मध्य येणाऱ्या हेरिटेज वृक्षांचे जतन करण्याचे निर्देश दिले. फूट ओव्हर ब्रिजच्या खाली असलेले तीन हेरिटेज वृक्षांचे संरक्षण करणे तसेच नवीन बिल्डिंगच्या समोरील एका पुरातन कडूनिंबाच्या झाडाचे सुद्धा संरक्षण करण्याचे निर्देश दिले. विनापरवानगी कापण्यात आलेल्या वृक्षांबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आल्याची माहिती याप्रसंगी उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली. रेल भूमी विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी पुष्कळ ठिकाणी झाड वाचविली आहेत.
अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पी.एस. खैरकर, एडीईएम एम. के. त्रिपाठी, एसएसई (डब्लू) के.बी. खडसे, मनपा उपायुक्त डॉ रंजना लाडे, स्वच्छ अससोसिएशनचे शतायू, प्रीती जामरे, ॲड. मृणाल चक्रवर्ती उपस्थित होते.