मुंबई : -अपारंपारिक ऊर्जास्त्रोत्तांच्या क्षमतेत वाढ करण्याच्या राज्याच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमाअंतर्गत महानिर्मितीच्या दोंडाईचा, जि. धुळे येथील २५० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठीचा वीज खरेदी करार आज १४ जानेवारी २०२२ रोजी महानिर्मिती व मे. टाटा पॉवर सौर्य लिमिटेड या दोहोंमध्ये मुख्यालय, मुंबई येथे संपन्न झाला. सदर करारांवर प्रकल्प विकासक या नात्याने महानिर्मितीचे वतीने सुनील इंगळे,मुख्य अभियंता (सौर) यांनी तर मे. टी.पी.सौर्य लिमिटेडचे वतीने राकेश सिंग ,चीफ बिझिनेस डेव्हलपमेंट यांनी स्वाक्षरी केली. या प्रसंगी महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे, संचालक (प्रकल्प) व्ही. थांगपंडीयन, संचालक (संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक (माईनिंग) पुरुषोत्तम जाधव, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (मा.सं) मानवेंद्र रामटेके तसेच कार्यकारी संचालक (सौर, अपारंपारिक ऊर्जा (प्रकल्प) आणि सां.नि. व सु.) राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
महानिर्मितीतर्फे विकसित करण्यात येत असलेले सदर सौर पार्क हे सुमारे ५०४.७१ हेक्टर क्षेत्रफळाचे असून केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत समाविष्ट आहे. तब्बल २५० मेगावॅट क्षमतेच्या या मोठ्या सौर प्रकल्पामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण न्यूनतम राखण्यात यश येणार असून महावितरणला अपारंपारिक ऊर्जेचे अनिवार्य प्रमाण (RPO) राखण्यास देखील मदत होणार आहे. या सौर प्रकल्पातून महानिर्मितीच्या माध्यमातून महावितरणला रु. २.५८ प्रति युनिट इतक्या रास्त दरात वीज प्राप्त होणार असल्याने वीजग्राहकांना दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पातून प्रतिवर्षी सुमारे ५.६७ दशलक्ष युनिट्स एवढी वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
या मोठ्या प्रकल्पामुळे दोंडाईचा परिसरातील स्थानिकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात रोजगार उपलब्ध होणार असून परिसराचा कायापालट होण्यास त्यायोगे मदत होणार आहे.
महानिर्मिती तर्फे महाराष्ट्र हरित करण्याकरिता मोठे योगदान देण्यात येत आहे. या प्रकल्पाबरोबरच, महानिर्मितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सौर उर्जा उत्पादन करण्यासाठी मा. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभत आहे. यामुळे, आजपर्यंत २०७ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प कार्यान्वित झालेले आहेत. भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांचे निर्देश आणि उद्दिष्टांच्या अनुषंगाने पुढील क्षमता वाढीसाठी महानिर्मिती मार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आजमितीस एकूण २७९५ मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प अंमलबजावणीची कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच महानिर्मिती मार्फत ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारण्याकरिता आनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत.