– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम
नागपूर :- रुग्णालयात येणाऱ्या क्षयरोग रुग्णाविषयी डॉक्टरांनी संवेदनशील असण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी केले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये सोमवारी (ता.24) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत 100 दिवसीय क्षयरोग दुरीकरण मोहिम तसेच 24 मार्च रोजीच्या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार, सहयोगी प्राध्यापक डॉ. ग्यानशंकर मिश्रा(मेयो), डॉ. अर्चना खाडे व सर्व झोनल वैद्यकिय अधिकारी, टी.बी. समन्वयक यावेळी उपस्थित होते.
डॉ. दिपक सेलोकर म्हणाले की, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाविषयी गंभीरता असणे आवश्यक आहे. क्षयरोगाचे रुग्ण शोधणे, त्यांच्यावर उपचार करणे, या आजाराचा प्रसार होणार नाही याकरीता आवश्यक ती खबरदारी घेणे, त्याकरिता गंभीररित्या देखरेख ठेवणे गरजचे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी रुग्णांप्रती संवेदनशील असण्याची गरज आहे. क्षयरोगाचा आजार कमी करणे आपले उदिदष्ट असले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी इंदिरा गांधी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) क्षयरोग विभाग प्रमुख प्रा. डॉ राधा मुंजे यांनी सांगितले की, क्षयरोग या आजाराप्रती लोकांच्या मनात चुकीची संकल्पना आहे, टीबी हा एक जुना आजार आहे. यामुळे लोकांच्या मनात पूर्वीपासूनच टीबी बद्दल शंका आणि भीती आहे. पूर्वीपासून टीबी या रोगाशी सामाजिक नकारात्मकता जोडली गेली आहे. एकप्रकारे टीबी या नावाला स्टिग्मा जुडलेले आहे. यामुळे ते दूर करण्याची गरज आहे. स्टीग्माला योग्यप्रकारे समोर गेले तर अनेक आजार कमी होऊ शकतो असे डॉ. मुंजे यांनी सांगितले. यावेळी सीमा पाटील, विजय डोमकावळे, तुषार कावळे यावेळी उपस्थित होते.