Ø राज्यस्तरीय पोषण माह शुभारंभ
Ø नवीन पीढी घडविण्यात अंगणवाडी सेविकांचा महत्वाचा वाटा
Ø लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे नियमित सुरू राहील
गडचिरोली :- प्रत्येक बालक हा सुदृढ व्हावा या उद्दिष्टातून गरोदर व स्तनदा मातांपर्यंत योग्य पोषण आहार पोहचूवन अभिमानास्पद कामगिरी करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी अंगणवाडी सेविकांना केले.
महिला व बाल विकास विभागाच्या पोषण अभियाअंतर्गत राज्यस्तरीय पोषण माह चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे करण्यात आला. जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, उपायुक्त संगिता लोंढे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीतून सुदृढ नवीन पिढी घडविण्यात महत्वाचा वाटा अंगणवाडी सेविकांचा माध्यमातून होत आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बाराही महिने नियमितपणे चांगले काम करत असल्याचे सांगतांना कोविड कालावधीत केलेले काम आणि मुख्यमंत्री योजनेत सर्वाधिक अर्ज नोंदणी केल्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणे निरंतर सुरू राहणार असून त्याला कोणतीही मुदत ठरवून दिलेली नाही. अर्ज भरण्यासाठीचा देय भत्ता ऑक्टोबर महिण्यात देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांचा सन्मान व्हावा म्हणून बालकाच्या नावापुढे प्रथम त्याच्या आईचं नाव मग वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय मे-2024 मध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुपोषणमुक्तीसाठी चांगले उपक्रम राबवित असल्याबद्दल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांचे विशेष अभिनंदन केले. पोषण माहांमध्ये पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा नंबर आणावा यासाठी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने नावीन्यपूर्ण काम करण्याचे त्यांनी सांगितले. दुर्गम भागात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना खनिकर्म निधीतून सायकल मंजूर करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी महिलांना सक्षम करणे ही शासनाची भूमिका असून यासाठी विविध क्रांतीकारक योजना राबविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, अन्नपूर्णा योजना, महिलांना मोफत उच्च शिक्षण आदि योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वच्छ आहार आरोग्यासाठी महत्व आणि फोर्टीफाईड फुड योजनेबाबत त्यांनी माहिती दिली.
आयुक्त कैलास पगारे यांनीही सुपोषीत बालक संकल्पनेवर शासनाच्या योजनांची माहिती दिली. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकेतून पोषण आहार योजना व कुपोषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी विविध योजनेंतर्गत लाभार्थींचा सत्कार करण्यात आला.
*नवेगाव अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन*
मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. इतकी सुसज्ज इमारत राज्यात प्रथमच पाहत असल्याचे सांगून त्यांनी अंगणवाडी इमारतीचे कौतुक केले.