वापर, खरेदी, विक्री, हाताळणी, साठवणूक केल्यास होणार कारवाई
नागपूर : मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडविताना नायलॉन मांजा/ पक्क्या धाग्याचा वापर करू नये. नायलॉन मांजाचा वापर, विक्री, हाताळणी, साठवणूक करणे कायद्याने दंडनीय असून अशी व्यक्ती आढळल्यास त्याच्यावर नियमान्वये कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी दिले आहे.
नायालॉन मांजामुळे जीवाला धोका निर्माण होउ शकतो. त्यामुळे नायलॉन मांजाचा वापर टाळून नागरिकांनी सुरक्षितरित्या संक्रांत सण साजरा करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
मा. उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल जनहित याचिका क्र. 01/2021 मधील प्राप्त आदेशान्वये तसेच महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण विभागाव्दारे पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1986 च्या कलम 5 अन्वये दि. 18/06/2016 व 20/12/2022 चे निर्देशानुसार पतंग उडविण्यासाठी मकरसंक्रात सणाच्या वेळी कृत्रिमरित्या/प्लास्टिकपासून तयार केलेल्या नायलॉन मांजा या नावाचे परिचित असलेल्या पक्क्या धाग्यांचा करण्यात येणारा वापर, विक्री, हाताळणी व साठवणुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. या माजांच्या वापरामुळे पक्षांना व मानवी जीवितांना तीव्र इजा होण्याचा धोका असतो. तसेच या मांजामुळे जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागपूर मनपा हद्दीतील सर्व मांजा विक्रेते यांना सूचित करण्यात येत आहे की, कृत्रिमरित्या प्लास्टिकपासून बनवलेल्या नायलॉन मांजाचा /पक्क्या धाग्याचा वापर करण्यात येउ नये, नायलॉन मांजाचा वापर/विक्री/हाताळणी/साठवणुक करतांना आढळुन आल्यास संबंधीतावर नियमान्वये कडक कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. तसेच शहरातील नागरिकांनी मकरसंक्रात सणाच्या वेळी नायलॉन मांजाचा वापर करु नये, असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे.