लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे देऊ नका; सरकारी यंत्रणेकडेच द्या – भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांचे आवाहन

मुंबई :- लाडकी बहीण योजनेचा वापर करून महायुती सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी कार्यकर्त्यांकडून केला जात असल्याने महिलांनी या योजनेचे फॉर्म विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे न देता थेट सरकारी यंत्रणेकडे द्यावेत, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केले. आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आणि जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांच्या 18 आणि 19 जुलै रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणूक ही महायुती म्हणून एकत्रितरित्या लढण्याबाबत चर्चा करण्यात आली. विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागांबाबत चर्चा झाली. कोणी किती जागा लढायच्या याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ योग्यवेळी घेतील, असेही रावसाहेब पाटील दानवे यांनी नमूद केले.

महायुतीत एकसंधपणा असताना महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे वारंवार दिसून येत आहे अशी टीका दानवे यांनी केली. मविआ तील तिन्ही प्रमुख घटकपक्षांचे नेते तर भावी मुख्यमंत्री म्हणून आपापल्या पक्षाच्या नेत्यांची नावे घेत आहेत. सर्वांनाच मुख्यमंत्री बनण्याची घाई झाल्याचे दिसून येत असून आघाडीतील बिघाडी चे दर्शन आत्तापासूनच जनतेला घडत आहे. आघाडीतील ही बिघाडी काही आत्ताची नव्हे तर सांगलीच्या जागेवरून मविआमध्ये झालेला वादंग लोकसभेवेळी दिसला आहेच असेही दानवे म्हणाले. मविआ मध्ये आलबेल नसताना त्यांच्यावर मतदारांनी विश्वास तरी कसा ठेवायचा असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

महायुती सरकार जनहितासाठी झटून काम करत असून विधीमंडळाच्या अधिवेशनात शेतक-यांची वीजबिल माफी, लाडकी बहीण, भावांतराप्रमाणे शेतक-यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई देणे हे आणि असे अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले असे दानवे यांनी नमूद केले. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजनांवर चहुबाजूंनी टीका करत असलेले मविआ चे नेते मात्र त्या त्या मतदारसंघात फलकबाजी करून महायुती सरकारच्या योजनांचे श्रेय लाटण्याचा हीन प्रयत्न करत असल्याची प्रखर टीका दानवे यांनी केली. अशी दुटप्पी भूमिका असलेल्या मविआच्या घटकपक्षांपासून सावध रहा आणि सरकारी यंत्रणेतूनच लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरा असे आवाहन त्यांनी केले.

भाजपाच्या पुण्यात रविवारी होणा-या अधिवेशनाला पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवणे आणि राज्यात पुन्हा महायुती सरकार आणण्याचा निर्धार कार्यकर्ते या अधिवेशनात करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद - पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

Sat Jul 20 , 2024
मुंबई :- मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील सुधारण्यासाठी भरीव उपाययोजना करिता सन २०२४-२५ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) १०१२ कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ७१ कोटी व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी अशा एकूण १०८८.७१ कोटी निधींची तरतूद करण्यात आली आहे, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com