नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धेचे उदघाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून आज करण्यात आले. मानकापूर येथील क्रीडा संकुलात या स्पर्धेचे आयोजन 3 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे तीन हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.स्पर्धेचे उदघाटन अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नरेश झुरमुरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी वनामतीच्या संचालक मिताली सेठी तर विशेष अतिथी म्हणून क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील उपस्थित होते.
आदिवासी समाजातील शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, भावी जीवनातील उत्कृष्ट वाटचालीकरिता आणि पारंपरिक कलागुणांच्या संवर्धनाकरिता आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. यंदाच्या स्पर्धेत भंडारा, अहेरी, चंद्रपूर, गडचिरोली, चिमूर, देवरी, नागपूर, वर्धा आणि भामरागड या आदिवासी प्रकल्पांतर्गत येणा-या आश्रमशाळेतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. बक्षीस वितरण तथा समारोपीय कार्यक्रम शुक्रवारी होणार आहे.