नागपूर :-अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्ष विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी धरण बळकटी करणाच्या सुरू असलेल्या कामांची आज पाहणी केली.
पाहणी दौऱ्यामध्ये समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी.के.पवार, मनपाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर गिरी आदी उपस्थित होते.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणासाठी सुरक्षेच्यादृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजने अंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी यावेळी करण्यात आली. धरणाच्या माती बांधकामा अंतर्गत सुरु असलेल्या अपस्ट्रिमिंगच्या कामांची पाहणी करून यातील उर्वरित कामांची माहिती घेण्यात आली.
धरणाचा विसर्ग वाहून जाण्याकरिता मुख्य गेट जवळ दहा मीटर क्षेत्र कापून त्याची एक मिटरने उंची कमी करण्याचे काम लवकरच हाती घेवून या महिन्याअखेर पूर्ण करण्यात येणार आहे, या कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी करण्यात आली. दीर्घकालीन उपायोजनेंतर्गत या भागात दोन चॅनल गेट उभारण्यात येणार आहेत. त्याबाबतची पाहणीही करण्यात आली.
अंबाझरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी सुरु असलेल्या नवीन पूल बांधकामाची पाहणी यावेळी करण्यात आली. येथील दुसऱ्या पुलाच्या बांधकामाबाबतही त्यांनी माहिती घेतली. पाहणी दरम्यान बिदरी यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही केल्या.