Ø विविध ठिकाणी भेटी व प्रत्यक्ष पाहणी
Ø फळबागेखालील क्षेत्र वाढविण्याचे निर्देश
Ø सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागेची पाहणी
यवतमाळ :- जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी उमरखेड येथे भेट देऊन तालुक्यातील विविध विकास कामे व शासकीय योजनांचा आढावा घेतला. या भेटीत त्यांनी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व संबंधितांना सूचना केल्या.
बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसिलदास सुरडकर, गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेशकुमार जामनेर व सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. कृषि विभागाकडून त्यांनी रब्बी क्षेत्राखालील लागवडीची माहिती घेतली. तालुक्यात फळबाग लागवडीचे क्षेत्र कमी असून ते वाढविण्यात यावे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष शिबिर घेऊन लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पुर्तता करून घ्यावी आणि त्यांना लाभ देण्यात यावा. तालुक्यात तुती लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना रक्कमेचे हप्ते देण्यात यावे. या सर्व लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सुर्यघर योजनेत समाविष्ठ करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात पुर्ववेळ आरोग्य कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक आहे. जे कर्मचारी रात्रीच्यावेळी थांबत नाही, त्यांची माहिती घेऊन त्यांना थांबण्याबाबत सूचित करावे. सौरकृषी वाहिनीसाठी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करावी. मागेल त्याला सौरऊर्जा योजना राबविण्याचे निर्देश दिले.
उमरखेड नगरपरिषद व ढाणकी नगरपंचायतीचा देखील आढावा घेतला. दोनही पंचायतींनी आपल्या हद्दीतील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होण्यासाठी घंटागाडीचे सुक्ष्म नियोजन करावे. फुटपाथवरील अतिक्रमनावर तत्काळ कार्यवाही करावी. शहरात फिरणाऱ्या बेवारस जनावरांवर आळा घालावे. प्रधानमंत्री आवास व रमाई आवास योजनेचे प्रस्ताव मार्गी लावावे. फायर स्टेशनसाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले. तसेच वसुलीचा आढावा घेतांना शंभर टक्के उद्दिष्ट गाठावे, अशा सूचना केल्या.
तालुक्यातील स्मशानभूमी व पांदन रस्त्यांची प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात यावी. ई-पिक पाहणीची कामे पुर्ण करण्यात यावी. ई-चावडीचे काम कमी असून ते वाढविण्यात यावे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खडका येथील सौरऊर्जा प्रकल्पासाठी जागेची पाहणी केली. उमरखेड नगरपरिषद, तालुका क्रीडा संकुल, गार्डन, पुतळा बांधकाम तसेच शहरातील काही भागात घंटागाडी नियमित येते किंवा नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली.