यवतमाळ :- जिल्हा बाल संरक्षण कक्षास बालविवाह होत असल्याची गोपनिय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे कक्षाने 6 बालविवाह थांबविले आहे. त्यात झरी जामणी येथील एक तर राळेगाव तालुक्यातील 5 बालविवाहांचा समावेश आहे.
राळेगाव तालुक्यातील आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर येथी 5 बालविवाहांचा समावेश आहे. बाल विवाहाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे राळेगाव व झरी जामणी तालुक्याचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, पोलिस स्टेशन राळेगाव व झरी जामणी, तसेच आठमुडीं, भूलगड, सावनेर, वलीनगर व माथार्जुन येथील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, गाव बालसंरक्षण समिती यांना माहिती देण्यात आली होती.
त्यानुसार या गावांना भेट देण्यात आली असता आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संस्थात्मक अविनाश पिसुर्डे, सामाजिक कार्यकर्ता आकाश बुर्रेवार, चाईल्ड लाईनचे फाल्गुन पालकर, दिव्या दानतकर, पूनम कन्नाके यांनी प्रत्यक्ष भेट दिली. राळेगाव तालुक्यातील आठमुर्डी, भूलगड, सावनेर व वलीनगर या गावातील मुलगा व मुलगी हे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सदर 6 बालविवाहातील बालक बालिकांच्या पालकांना ग्रामपंचायत येथे बोलाविण्यात आले व गाव बाल संरक्षण समितीच्या उपस्थित सहाही बालविवाह थांबविण्यात आले व बाल कल्याण समिती समक्ष उपस्थित राहण्याबाबत सुचना पत्र देण्यात आले आहे.
बालविवाह थांबविण्याची ही कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, परीविक्षा अधिकारी रवींद्र गजभिये, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात व राळेगावचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी विटाळकर, झरी जामणीचे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पांडे, दोनही तालुक्यांचे गट विकास अधिकारी, पोलिस अधिकारी राणे व ठाकरे यांचे सहकार्य लाभले.