– कायर येथे पडीक क्षेत्रावर 25 टनाची पहिली चारा तोड
यवतमाळ :- गायरान पडीक क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. वणी तालुक्यातील कायर येथे पहिल्या कापणीला 25 टन चारा उत्पादन झाले आहे. कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते गावातील पशुपालक व दुध उत्पादक तसेच वणी येथील गौरक्षण संस्थेला उत्पादीत केलेला हिरवा चारा व लागवडीसाठी थोंबे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. विजय राहाटे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. तुषार बावणे, डॉ.राजेंद्र अलोणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. जया राऊत, डॉ. जामकर, डॉ. कनले, डॉ. पाटील, डॉ. राठोड, डॉ. महेश डहाके, पशुधन विकास अधिकारी प्रमोद शेगोकार व परिसरातील सर्व पशुपालक उपस्थित होते.
जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये गायरान पडीक क्षेत्रावर कुरण विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुधाळू पशुधनाला सकस आहार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने व पडीक गायरान क्षेत्र या निमित्ताने उपयोगात आणण्यासाठी शासनाने हे धोरण ठरविले आहे. वणी तालुक्यातील कायर येथे पडीक गायरान जमिनीवर बहुवार्षिक चाऱ्याचे उत्पादन घेण्यात आले. पहिल्या कापणीला 25 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळाले आहे.
कायर गावातील पशुपालक व दुध उत्पादक तसेच वणी येथील गौरक्षण संस्थेला अॅड निलेश हेलोंडे यांच्याहस्ते उत्पादीत हिरवा चारा व लागवडीसाठी थोंबे वाटप करण्यात आले. पशुसंवर्धन विभाग, मनरेगा व स्थानिक ग्रामपंचायतच्या सहयोगाने वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात आला. या चारा पिकाच्या कापणीतून पुढील 3 महिन्यात अंदाजे 50 टन हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अपेक्षित आहे. या उपक्रमामध्ये स्थानिक सरपंच, रोजगार सेवक, मनरेगा प्रकल्प अधिकारी व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.
चारा उत्पादन करावयाच्या अभिनव उपक्रमातून जिल्ह्यात सर्व गोरक्षण संस्था व पशुपालकांकडे चारा समृद्धी निर्माण होवू शकते, असे प्रतिपादन अॅङ हेलोंडे यांनी केले. चाऱ्याच्या उत्पादनाचा उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांनी पशुसंवर्धन विभाग, मनरेगा व ग्रामपंचायतचे कौतुक केले. कायर गावात गायरान क्षेत्रावर 100 वर्षापासून पडीक असलेल्या जमिनीवर बहुवार्षीक चाऱ्याचे उत्पादन घेण्याचा अभिनव उपक्रम पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात आला.