यवतमाळ :- भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्यावतीने आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना बँकेचे आधार सीडेड बँक अकाउंट कार्डचे वितरण जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अमर गजभिये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक यवतमाळ शाखेचे वरिष्ठ व्यवस्थापक चित्रसेन बोदीले, व्यवस्थापक अमोल रंगारी उपस्थित होते. बँक अकाउंट कार्ड सुपूर्द करण्यात आलेल्या लाभार्थी महिला जयश्री राजेंद्र ढोकणे, माया कवडू नगराळे, अर्चना विनोद तिखे, सलोनी बंडू थूल उपस्थित होत्या.
भारतीय डाक अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे विस्तृत नेटवर्क जाळे संपूर्ण जिल्हाभर पसरलेले आहे. जिल्ह्यात सुमारे ४०४ पोस्ट ऑफिसमधून बँकेचे कार्य चालते. त्यामध्ये ३६३ ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिस आणि ४० पोस्ट ऑफिस हे शहरी आणि मध्य शहरी आणि शहरी भागात कार्यरत आहेत, जेथे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे कार्य चालते.
या ठिकाणी नागरिक संपर्क साधून अवघ्या ५ मिनिटमध्ये आधार सीडेड खाते काढू शकतात. सर्व पोस्टमनकडे डिपार्टमेंट मोबाईल आणि बायोमेट्रिक मशीन दिलेले आहेत, ज्याच्या आधारे लाभार्थ्यांचा अंगठा लावून पडताळणी केली जाते आणि अकाउंट कार्ड दिले जाते. यासाठी कोणतेही कागदपत्र जमा करावे लागत नाही. फक्त आधार क्रमांक आणि मोबाईल सोबत असावा लागतो. लाभार्थींसह जवळपास साडेतीन लक्ष पेक्षा जास्त ग्राहक इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे ग्राहक म्हणून जुळलेले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त हे खाते पीएम किसान योजना, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, ज्येष्ठ नागरिकांना निराधार योजना इत्यादींसाठी उपयोगी पडते. जिल्ह्यातील सर्व पात्र महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या गावातील आणि परिसरातील पोस्ट ऑफिसशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.