नागपूर : सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये “स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण” पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी कायाकल्प उपक्रमाची अंमलबजावणी सर्व जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिणी केंद्र या ग्रामीण भागातील तसेच शहरी सामुदायिक आरोग्य केंद्र आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या शहरी भागातील आरोग्य केंद्रामध्ये केली जाते. निर्धारित मानांकन पूर्ण करणाऱ्या आरोग्य सुविधांना दर वर्षी नगद पुरस्कार दिले जाते. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कायाकल्प कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल आरोग्य संस्थाप्रमुखांना पारितोषिक वितरण करून सन्मानित करण्यात येणार आहेत.
यामध्ये जिल्हयातून उमरेड तालुक्यातून बेला प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास ढोक यांना प्रथम पुरस्कार 2 लक्ष रुपये, हिंगणा तालुक्यातील निलडोह आरोग्यवर्धिणी केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. तर्केश्वरी गांवीर यांना प्रथम पुरस्कार 1 लक्ष रुपये, मौदा तालुक्यातील गांगणेर आरोग्यवर्धिणी केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. धिरज बाहेश्वर यांना द्वितीय पुरस्कार 50 हजार रुपये आणि रामटेक तालुक्यातील महादुला आरोग्यवर्धिणी केंद्राचे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप सरकार यांना तृतीय पुरस्कार 35 हजार रुपये असा समावेश आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
12 डिसेंबर 2022 रोजी घोषित झालेल्या “कायाकल्प पुरस्कार 2021-22 मध्ये नागपूर जिल्हयातील 8 रुग्णालय, 43 प्राथमिक आरोग्य केंद्र, 60 आरोग्यवर्धिणी केंद्रांचे अंतिम मूल्याकन बाह्य मूल्यांकनाद्वारे राज्यस्तरावरून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचननुसार व राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राद्वारे (NHSRC) तयार करण्यात आलेल्या चेकलिस्ट प्रमाणे करण्यात आले होते. त्यातील एकूण 8 रुग्णालये यांना रु. 10 लक्ष, 26 प्राथमिक आरोग्य केंद्रांना व 19 आरोग्यवर्धिणी केद्रांना 20.35 लक्ष रुपये असे एकूण 30.35 लक्ष रुपयांचे पुरस्कार नागपूर जिल्हयातील आरोग्य सुविधांना घोषित झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 53 आरोग्य संस्थांना कायाकल्प अंतर्गत एकूण 30.35 लक्ष रुपयांचे पुरस्कार घोषीत झाले आहे.
@ फाईल फोटो