कामगार कल्याणासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांमध्ये संवाद

मुंबई : राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या सुरु असलेल्या तसेच नवीन योजनांवर राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे आणि उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर यांच्यात चर्चात्मक संवाद झाला. यावेळी मंत्री राजभर यांनी महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय आहेत असे कौतुक करून खाडे यांना उत्तर प्रदेश भेटीचे निमंत्रण दिले.

मंत्रालयात मंगळवारी (दि.२९) झालेल्या या बैठकीत दोन्ही राज्यातील कामगारांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचे आदान-प्रदान करण्यात आले.

यावेळी कामगार मंत्री डॉ.खाडे विभागाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती देतांना म्हणाले, राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन आणि राज्य कामगार विमा योजना (ईएसआयसी) रुग्णालये उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याबरोबरच कामगारांच्या मुलामुलींसाठी क्रीडा संकुल योजना राबविण्याचा मानस आहे. ५५ वर्षांवरील घरेलू नोंदणीकृत कामगारांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे मंत्री डॉ.खाडे यांनी यावेळी सांगितले.

असंघटित कामगारांच्या विकासासाठी योजना राबवितांना कामगारांची आकडेवारी आवश्यक असते. देशभरातील असंघटित कामगारांच्या आकडेवासाठी केंद्र सरकार काम करीत आहे. या कामगारांना सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडे निधी उपलब्ध आहे. यासोबतच सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीच्या माध्यमातूनही कामगार कल्याणासाठी निधी उपलब्ध केला जात आहे. राज्याचा कामगार विभाग उत्तमरित्या काम करीत असल्याचे कामगार मंत्री खाडे यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या कामगार कल्याण योजना अनुकरणीय – मंत्री अनिल राजभर

उत्तर प्रदेशचे श्रम व रोजगार मंत्री अनिल राजभर म्हणाले, कामगारांसाठी चांगले काम करणाऱ्या राज्यातील योजना, उपक्रमांच्या माहितीचे आदान-प्रदान, संवाद होणे गरजेचे आहे. उत्तर प्रदेश सरकारने श्रमिक कामगारांच्या मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर अटल आवासी विद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. औद्योगिक विकासाकडे वाटचाल करीत असतांना श्रमिक कामगारांकडे दुर्लक्ष होणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या सर्वच क्षेत्रात व्यवसायानुकूल वातावरणाचा (ईज ऑफ डुईंग बिजनेस) वापर होत आहे. त्यामुळे श्रमिक कामगार दुर्लक्षित होता कामा नये. यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. इतर राज्य व देशांतील योजनांच्या माहितीचे आदान-प्रदान, संवाद होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या बांधकाम कामगारांसाठीच्या घरकुल योजनेची स्तुती करुन याच धर्तीवर उत्तर प्रदेशात ही योजना राबविण्याचा मानस असल्याचे मंत्री राजभर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी असंघटित कामगार आयुक्तालय, कामगार आयुक्तालय, कामगार कल्याण मंडळ, घरेलू कामगार, आम आदमी विमा योजना, महाकल्याण क्रीडा प्रबोधिनी आदी योजना, उपक्रम आणि कामकाजाची सादरीकरणाद्वारे माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

या बैठकीला कामगार विभागाचे सह सचिव शशांक साठे, उपसचिव दादासाहेब खताळ, उपसचिव दीपक पोकळे, कामगार कल्याण मंडळाचे आयुक्त रविराज इलवे, उपायुक्त सुनिता म्हैसकर, उत्तर प्रदेशचे कामगार अतिरिक्त आयुक्त मधुर सिंह, उपायुक्त शमीम अख्तर, उपसंचालक ब्रिजेश सिंह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित - मतदार यादी निरीक्षक विजयालक्ष्मी बिदरी

Thu Dec 1 , 2022
राजकीय पक्ष प्रतिनिधी सोबत बैठक नागपूर : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी व मतदारांना आपले मतदान ओळखपत्रासोबत आधार कार्ड जोडणीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन मतदार यादी निरीक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com