धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार, सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

धुळे :- जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.

येथील एसआरपीएफ मैदानावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानातंर्गत धुळे जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मंत्री अनिल पाटील, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार, आमदार किशोर दराडे, जयकुमार रावल, काशीराम पावरा, मंजुळा गावित, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण, महापौर प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते.

‘शासन आपल्या दारी’ अभियानात धुळे जिल्ह्यात 3 लाख 21 हजारपेक्षा अधिक नागरिकांना लाभ देण्यात आला आहे, असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी या लोकाभिमुख कार्यक्रमास राज्यभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ एकाच छताखाली नागरिकांना मिळत आहे. सरकारी कार्यालयांच्या चकरा सर्वसामान्यांना माराव्या लागू नये यासाठी शासनाला काम करावयाचे आहे. आदिवासी समाज संघटनेच्या मागण्यांवर बैठक घेऊन त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल.

गेल्या वर्षभरात शासनाने सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले. धुळे-नरडाणा-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी केंद्र सरकार 50 टक्के व राज्याचा 50 टक्के निधी देणार आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.

धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनच जनतेपर्यंत जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून देशाचा झपाट्याने विकास होत आहे. तापी नदीमधील बॅरेजच्या पाण्याचा वापर वाढला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आर्थिक शिस्त ठेवत शासन सर्वसामान्यांसाठी सर्वांगीण काम करत आहे. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळविण्यासाठी खर्च करण्याचे शासनाचे धोरण आहे. पाऊस नसल्याने पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे, असे नमूद करून धरण पाणीसाठ्याचे योग्य नियोजन प्रशासनाने करावे, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

धुळे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. धुळे जिल्ह्यात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव-वाड्या-वस्त्यांपर्यंत रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर शासनाचा भर राहणार आहे. धुळे जिल्ह्यातील उद्योगांच्या विकासावरही शासनाचा भर राहील, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री महाजन म्हणाले की, धुळे जिल्ह्यात काही भाग आदिवासी बहूल आहे. त्यामुळे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना आता कुठे जाण्याची गरज नाही. तुमच्या कामासाठी शासनच आता तुमच्या दारी आले आहे. प्रत्येकाला घर, प्रत्येक घरी शौचालय, वीज, पिण्याचे पाणी, गावांमध्ये जाण्यासाठी रस्ते, प्रत्येकाला अन्नसुरक्षा मिळाली पाहिजे. असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. महात्मा फुले आरोग्य योजनेत 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात आले आहेत. एक रुपयात पीक विमा योजना, महिलांना एसटी तिकिटात 50 टक्के सवलत, 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास, अशा सर्वसामान्यांच्या कल्याणकारी योजना शासन राबवत आहे. राज्य व देशात पायाभूत सुविधांचे जाळे तयार होत आहे. अक्कलपाडा धरण व सुलवाडे बॅरेज प्रकल्पामुळे धुळे जिल्ह्यातील लाखो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. केंद्रीय योजनेत या प्रकल्पांचा समावेश केल्याने कामांना गती येणार आहे. धुळे महानगरपालिकेला सुध्दा विकासकामांसाठी मुबलक निधी देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. ज्येष्ठ लोक कलावंत नथ्थू ईशी, जितेंद्र भोईटे, संतोष ताडे, अरविंद भामरे, मांगू मगरे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते वृध्द कलावंत पेन्शन योजनेच्या लाभाचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. रोजगार मेळाव्यातून रोजगार मिळालेले दिनेश पाटील, चेतन गवळी, अमोल जाधव या तरूणांना यावेळी नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी धुळे जिल्ह्याने विविध योजनांच्या माध्यमातून दिलेल्या लाभांची माहिती देणारी दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात आली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे टोपी, उपरणे, महिला बचतगटांनी तयार केलेल्या खानदेशी पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मुख्यमंत्री जन कल्याण कक्षाचे राज्य मुख्य समन्वयक डॉ. अमोल शिंदे, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास टेकाळे, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, परिविक्षाधीन सनदी अधिकारी सत्यम गांधी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी शर्मा यांनी ‘शासन आपल्या दारी’ अभियानात केलेल्या कामांची माहिती विशद केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी आणि कामगार, आदिवासी विभागाच्या लाभार्थ्यांना कामगार किट, ट्रॅक्टरचे वाटप केले. तसेच निवडक सरपंचाशी संवादही साधला. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, धुळे जिल्ह्यातील आदिवासी समुदायातील विविध कलाकारांच्या कलापथकांनी स्थानिक आदिवासी नृत्य सादर केले.

एका छताखाली शासकीय विभागांच्या माहितीचे स्टॉल

‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे 34 स्टॉल उभारण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी आदिवासी विकास विभागाच्या स्टॉलला भेट देऊन लाभार्थ्यांना लाभाचे वितरण केले. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली मिळत मिळाल्यामुळे या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून नागरिकांच्या लेखी समस्या, तक्रारी, निवेदने स्वीकारण्यात आली. जिल्हा सामान्य प्रशासन रूग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरासही या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोजगार मेळाव्यात एकूण 1800 युवकांनी नोंदणी केली. यापैकी 1250 युवकांची प्राथमिक निवड करण्यात आली, तर 215 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या मेळाव्यात 15 विविध आस्थापना सहभागी झाल्या होत्या.

यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार डॉ. गावित, आमदार मंगेश चव्हाण, आमदार जयकुमार रावल यांनी मनोगत व्यक्त केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मराठी संगीत रंगभूमीचा इतिहास हा मोलाचा साहित्य दस्तावेज - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Tue Jul 11 , 2023
– ग्रंथ प्रकाशनास आवश्यक ते सर्व सहकार्य करणार मुंबई :- मराठी संगीत रंगभूमीच्या उज्ज्वल कालखंडाचा इतिहास हा ग्रंथरुपाने येणे आवश्यकच आहे. त्यामुळेच शब्द-स्वर लेण्यांची संगीत नाट्य गौरवगाथा असणाऱ्या या मराठी संगीत रंगभूमीच्या तीन खंडात प्रकाशित होणाऱ्या ग्रंथास आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. येत्या वर्षभरात हा मोलाचा साहित्य दस्तावेज प्रकाशित होईल यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!