धानोरा तालुका आरोग्याचं कुरुक्षेत्र – डॉ. अभय बंग

– सर्चच्या सहकार्याने धानो-याचं आरोग्य हमखास सुधारेल – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी, गैर आदिवासी भागात अपु-या सोयी सुविधांमुळे आरोग्याचे प्रश्न आजही आहेत. अनेक अधिकारी, डॉक्टर, परिचारिका गडचिरोलीच्या आदिवासी भागात येण्यासाठी घाबरतात. बाहेरून येणा-या लोकांना इथल्या जंगलाची, नक्षलांची, सापांची भिती वाटते तिथे तुम्ही राहता, तुम्हीच या दुर्गम आदिवासी भागातील लोकांची आशा आहात असे ‘सर्च’ या संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग आशांना संबोधून म्हणाले. ते शोधग्राम येथे आयोजित आशा सेविकांच्या प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका हा 90 टक्के आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो. धानोरा तालुक्यातील 48 गावांमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्चचे आरोग्यदूत काम करत आहेत. यावर्षीपासून सर्चने संपूर्ण धानोरा तालुक्यातील 230 गावांचे आरोग्य सुदृढ करण्याची जबाबदारी घेतली आहे. सर्चने 1988 साली घरोघरी नवजात बाळ आणि मातांची काळजी हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा गावातीलच अल्पशिक्षीत बायांना प्रशिक्षीत करून गावातील आरोग्याची धुरा त्यांच्या हातात सोपवली आणि बालमृत्यू, मातामृत्यू रोखण्यात यश आले. आता आशा सेविकांना प्रशिक्षीत करून आदिवासी भागातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी सर्च आणि गडचिरोली जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

धानोरा तालुक्यातील संपूर्ण पाचही प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा सेविकांना सर्च प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षण शिबिराची पहिली बॅच 7 जून पासून शोधग्राम येथे सुरू झाली आहे.

प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मंचावर पद्मश्री डॉ. अभय बंग, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, डॉ. स्वप्नील बेलेकर, डॉ. आनंद मोडक तालुका आरोग्य सहाय्यक, कारवाफा – गोडलवाहीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश जांभुळे उपस्थित होते.

यावेळी डॉ. साळवे यांनी सर्च व डॉ. अभय बंग यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, ज्या शोधग्राम मधून ‘आशा’ची सुरूवात झाली होती तिथूनच आता आशांनाही प्रशिक्षण घेण्याचं भाग्य प्राप्त झालं आहे त्यामुळे या प्रशिक्षणातून आशांचे स्किल अधिक वाढेल असा विश्वास डॉ. साळवे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांनी त्यांच्या विद्यार्थी जीवन व सर्चच्या आठवणी सांगितल्या. तसेच, धानोरा तालुक्यात मागील वर्षी एकही मातामृत्यू न झाल्याचे सांगत हीच सृदूढ स्थिती कायम ठेवू असे म्हणाले.

7 जून पासून शोधग्राम येथे आशांचे निवासी प्रशिक्षण शिबीर सुरू झाले असून संपूर्ण धानोरा तालुक्यातील 5पाचही आरोग्य केंद्रासाठी काम करणा-या आशांना सर्च प्रशिक्षण देणार आहे. धानोरा तालुक्यातील तब्बल १७६ आशांचा या शिबिरात समावेश असणार आहे.

(प्रशिक्षणात काय शिकायला मिळेल)

सर्चचे ज्येष्ठ कार्यकर्ता डॉ. बैतुले आणि डॉ. सुप्रियालक्ष्मी आशा सेविकांना हे प्रशिक्षण देत आहे. या प्रशिक्षणादरम्यान आशांना नोंदणी फऑर्म, (रेकॉर्ड बूक) कोणाला खोकला असल्यास तो साधा खोकला की न्युमोनिया ओळखण्याचे वैज्ञानिक आणि शास्त्रिय ज्ञान तसेच नवजात बाळाचा श्वास मोजण्यासाठी उपकरणं, सर्वसाधारण आजारांवर तत्काळ उपचार होण्यासाठी औषधं सर्च तर्फे आशांना देण्यात येणार आहे. यासाठीचे संपूर्ण ज्ञान प्रात्याक्षिकं त्यांच्याक़डून करून घेण्यात येणार आहे.

७ जून ते ८ जुलै पर्यंत हे प्रशिक्षण शिबिर चालणार असून या प्रशिक्षण शिबिरात गोडलवाही, रांगी, कारवाफा, मुरुमगाव, पेंढरी या पाच प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे.

७ जून ते १० जून गोडलवाही, १४ ते १७ जून रांगी, २१ ते २४ जून कारवाफा, २६ ते २९ जून मुरूमगाव, ५ ते ८ जुलै पेंढरी असे महिनाभर हे प्रशिक्षण शिबिर चालणार आहे.

धानोरा तालुक्यात सध्या प्रामुख्याने मलेरिया, न्युमोनिया, हगवण या आजाराची समस्या आहे. आशांच्या मदतीे धानो-याची आरोग्य स्थिती सुधारण्यासाठी सर्च हा उपक्रम राबवत आहे.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंदमान एक्सप्रेसने मद्याची तस्करी फसली

Fri Jun 9 , 2023
– बर्थखाली आढळल्या दोन बॅग – आरपीएफ गुन्हे शाखेच्या पथकाने घेतली झडती नागपूर :-आरपीएफ गुन्हे शाखेच्या कर्तव्यदक्षतेमुळे मद्याची तस्करी फसली. अंदमान एक्सप्रेसच्या प्रत्येक डब्याच्या झडतीत बेवारस ट्राली बॅगमध्ये 80 हजार रुपये किंमतीची दारू मिळून आली. मात्र, दोन्ही बॅगवर कोणीही हक्क सांगितला नाही. मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी अंमलीपदार्थाच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी तसेच गुन्ह्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेगवेगळे पथक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!