बेला :- विद्यार्थ्यांचे मनातून गणिताची भीती नाहीशी करण्यासाठी ऊर्जा ब्रेन अर्थमॅटिकच्या ६ व्या राष्ट्रीय अबॅकस प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील जवळपास तेराशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये बेला येथील धनश्री ऊर्जा अबॅकस च्या ८२ मुलांनी सहभाग घेतला होता त्यापैकी ४९ विद्यार्थ्यांनी ट्रॉफी व विजेतेपद पटकावले. याबद्दल बेला व परिसरात विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नागपूर येथील रॉयल माँ गंगा सेलिब्रेशनमध्ये गेल्या १९ जानेवारीला ही स्पर्धा झाली व २० जानेवारीला बक्षीस वितरण पार पडले. 6 मिनिटात 70 गणित विद्यार्थ्यांना सोडवायचे होते. सदर स्पर्धेत सर्वात जास्त विजेतेपद बेल्यातील धनश्री ऊर्जा अबॅकस या सेंटरच्या विद्यार्थ्यांनी मिळवले. त्याकरिता धनश्री ऊर्जा अबॅकसचे संचालक वंदना नरेश कळसकर व नरेश वसंत कळसकर यांना बेस्ट लर्निंग सेंटर व बेस्ट पार्टिसिपेशन सेंटर म्हणून दोन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यशस्वीतेसाठी धनश्री ऊर्जा अबॅकस च्या संचालकांनी विद्यार्थ्यांची मेहनत व त्यांच्या आई-वडिलांकडून मिळालेले मार्गदर्शन तसेच सहयोग व ऊर्जा अबॅकसचे डायरेक्टर रोशन काळे,हितेश आदमने यांना विशेष धन्यवाद दिला. त्यांच्यामुळे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना आपल्यातील टॅलेंट दाखवण्याचा एक मोठा मंच त्यांनी मिळवून दिला. या प्रतियोगितेमध्ये 300 हून अधिक ट्रॉफीज तसेच 1300 पदक, रोख पुरस्कार आणि चॅम्पियन पुरस्कार वितरित करण्यात आले.
अबॅकस प्रतियोगिता व बक्षीस समारंभाचे अध्यक्ष मोहन नाहतकर,मुख्य अतिथी संजय भेंडे, विवेक नाहतकर, स्मिता नाहतकर, व जान्हवी ठेमदेव यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.