– जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा
यवतमाळ :- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची मासिक सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन (बचत भवन) येथे आयोजित करण्यात आली होती. समितीकडे प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारींवर संबंधित विभागाने कालमर्यादेत कारवाई करावे, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उपाध्यक्ष अनिल खंडागळे यांनी दिले.
बैठकीला अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसह परिषदेचे सदस्य सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रा.नारायण मेहरे, राजेश पोहरे, शेखर बंड, हितेश शेठ, बीरेंद्र चौबे, प्रा. केशव चेटूले, अनंत भिसे, कैलासचंद वर्मा, डॉ. श्रीधर देशपांडे, राजेंद्र निमोदिया, मनोहर देशमुख, प्रकाश बुटले आदी उपस्थित होते.
खंडागळे यांनी प्रथम ग्राहक परिषदेस प्राप्त मागील तक्रारी व त्यावर संबंधित विभागाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर ज्या विभागाशी ती तक्रारी संबंधित आहे, अशा विभागाने त्यावर वेळीच कार्यवाही करणे आवश्यक आहे. परिषदेच्या सदस्याने एखादी तक्रार सादर केल्यानंतर त्या तक्रारीवर केलेल्या कारवाईची माहिती सदस्यांना देखील उपलब्ध करून दिली पाहिजे, असे खंडागळे यांनी सांगितले.
यावेळी परिषदेस नव्याने प्राप्त तक्रारी देखील ऐकून घेण्यात आल्या. सदर तक्रारी ज्या विभागांशी संबंधित असतील त्यांना पाठवून तातडीने कारवाईचे निर्देश देण्यात आले. यावेळी अशासकीय सदस्यांनी सादर केलेल्या तक्रारी, सुचनांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला पोलिस, बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.