स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त विशेष मोहीम नागपूर विभागात 99.31 टक्के मोफत सातबारा वाटप
नागपूर, दि. 24 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला शेतीचा अधिकार अभिलेख सातबारा मोफत शेतकरी खातेदाराच्या घरोघरी जाऊन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नागपूर विभागातील 24 लाख 89 हजार 719 नवीन स्वरुपातील सुधारित गाव नमुना सातबारा मोफत वाटप करण्यात आले आहे. विभागातील 99.31 टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.
महात्मा गांधी यांच्या स्वराज्य संकल्पनेत म्हणजेच संपूर्ण स्वातंत्र्यामध्ये शेती ही सर्व विकासाची आधारशिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे योगदान विचारात घेऊन महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेल्या अधिकार अभिलेख विषयक सातबारा अद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये तलाठ्यामार्फत प्रत्येक शेतकरी खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत नागपूर विभागात 16 लाख 51 हजार 944 खातेदारांना 24 लाख 89 हजार 519 संगणकीकृत सातबारा मोफत वाटप करण्यात आला असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.
नवीन स्वरुपातील सुधारित गाव नमुना सातबारा घरपोच मोफत वाटपाच्या मोहिमेमध्ये नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. तर गोंदिया जिल्ह्यात 99.69 टक्के तर वर्धा जिल्ह्यात 96.22 टक्के म्हणजेच विभागात 99.31 टक्के मोफत संगणकीकृत सातबारा शेतकऱ्यांना घरपोच उपलब्ध करुन देण्यात आला. यासाठी भूमीअभिलेख विभागाने संपूर्ण तांत्रिक सहाय्य उपलब्ध करुन दिले आहे.
संगणकीकृत मोफत सातबारा वाटप मोहीम राबवताना विभागीयस्तरावर केलेल्या नियोजनानुसार विभागातील 16 लाख 68 हजार 140 शेतीच्या खात्यांची संख्या लक्षात घेऊन 24 लाख 68 हजार 749 गाव नमुना सातबारा वाटपाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील 3 लाख 63 हजार 58 शेतकरी खातेदारांना 4 लाख 91 हजार 285 गाव नमुना सातबाराचे वाटप करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील 2 लाख 49 हजार 709 शेतकरी खातेदारांना 4 लाख 33 हजार 411 गाव नोंदणी सातबारा वाटप, चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लाख 41 हजार 332 खातेदारांना 4 लाख 77 हजार 758 सातबारा, तर गडचिरोली जिल्ह्यातील 1 लाख 68 हजार 218 खातेदारांना 2 लाख 82 हजार 277 गाव नमुना सातबाराचे मोफत म्हणजे शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील 2 लाख 82 हजार 13 शेतीच्या खातेदारांपैकी 2 लाख 81 हजार 138 खातेदारांना 5 लाख 277 गाव नमुना सातबाराचे वाटप म्हणजेच 99.69 टक्के वाटप झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील 2 लाख 57 हजार 414 शेतीच्या खातेदारांपैकी 2 लाख 48 हजार 489 खातेदारांना 3 लाख 4 हजार 511 नवीन स्वरुपातील सुधारित गाव नमुना सातबाराची संगणकीकृत प्रत तलाठ्यामार्फत घरपोच मोफत देण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिली.