– सावनेर, मौदा बस स्थानकावर लवकरच
– नागपूर विभागात दुप्पट विक्री
नागपूर :-अलिकडे बाटलीबंद पाण्याची प्रचंड मागणी वाढली. यातही ब्रॅण्डेड कंपनीच्या पाण्याची बाटलीला प्राधान्य दिले जाते. प्रवासात किंवा गर्दीच्या ठिकाणी बाटलीबंद पाणीच वापरले जाते. प्रवाशांची मानसिकता लक्षात घेता एसटी महामंडळाने स्वतःचे ब्रॅण्डचे पाणी विक्री करण्याचासाठी पुढाकार घेतला. आता ‘नाथजल’ या नावाने सर्व बस स्थानकावर बाटलीबंद पाणी विकले जाते. ‘नाथजल’ला चांगली मागणी असून लवकरच सावनेर आणि मौदा आगारात ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध असेल.
नागपूर विभागात आठ आगार आहेत. त्यापैकी गणेशपेठ, मोरभवन, काटोल आणि कोंढाळी बस स्थानकावर ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध आहे. म्हणजे याठिकाणी खाजगीला एजन्सी दिली आहे. तर रामटेक, उमरेड यासाठी गणेशपेठ हेच आगार देण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत सावनेर आणि मौदा स्थानकावरही ‘नाथजल’ सुरू होईल.
नागपूर विभागाचा विचार केल्यास मागच्या वर्षीच्या तुलनेत ‘नाथजल’च्या विक्रीत दुप्पट वाढ झाली. मागच्या वर्षात जवळपास महिण्याकाठी 15 ते 20 हजार बाटल्यांची विक्री व्हायची. मात्र, डिसेंबर महिण्यात विक्री दुप्पट म्हणजे 36 हजारपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक विक्री गणेशपेठ डेपोत -19 हजार 200, मोरभवन- 1800, काटोल-1800 आणि कोंढाळी 13 हजार 200 ‘नाथजल’ची विक्री झाली. आता महिण्याभरात तापमान वाढेल, यासोबतच पाण्याच्या मागणीत वाढ होईल. त्यामुळे आजचा 36 हजारांचा आकडा 50 हजारांच्या वर जाईल. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एक लिटर ‘नाथजल’ पंधरा रुपयात
650 मिलिलिटर व 1 लिटर बाटलीबंद स्वरूपामध्ये ‘नाथजल’ विक्रीसाठी उपलब्ध आहे. यांचा दर अनुक्रमे 10 रुपये व 15 रुपये इतका आहे. टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्व बस स्थानकांवर हे पेयजल उपलब्ध होणार आहे. यातून प्रत्येक 650 मिलिलिटर बाटलीबंद पाण्यामागे 45 पैसे आणि एक लिटल बाटलीबंद पाण्यामागे एक रुपये एसटीला मिळतोय. बाटलीबंद पाण्याचे कंत्रा पुणे येथील ऑक्सीकूल या कंपनीला देण्यात आले आहे.
@ फाईल फोटो