डिफकनेक्ट 2024: महत्वपूर्ण आणि सामरिक संरक्षण तंत्रज्ञानातील नवोन्मेषांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते अदिती योजनेचे उद्घाटन

– अदिती योजना योजना तरुणांच्या नवकल्पनांना चालना देऊन भारताला तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यास ठरेल सहाय्यकारक: राजनाथ सिंह

– 11 व्या डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंजचे 22 समस्या विधानांसह अनावरण

नवी दिल्‍ली :- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 04 मार्च 2024 रोजी नवी दिल्ली येथे डिफकनेक्ट 2024 दरम्यान, महत्वाच्या आणि सामरिक संरक्षण तंत्रज्ञानातील नवोन्मेषांना प्रोत्साहन देण्यासाठी आयडीईएक्स (अदिती) सह अभिनव तंत्रज्ञानकुशल विकास योजनेचे उदघाटन केले. या योजनेअंतर्गत, स्टार्ट-अप हे संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांसाठी 25 कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान प्राप्त करण्यास पात्र आहेत. “ही योजना तरुणांच्या नवोन्मेषांना चालना देऊन देशाला तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेण्यास मदतगार ठरेल,” असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी उद्योग नेते, उद्योजक, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते यांच्या मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केला.

वर्ष 2023-24 ते 2025-26 या कालावधीसाठी 750 कोटी रुपयांची अदिती योजना ही संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या (डीडीपी) आयडीईएक्स (संरक्षण उत्कृष्टतेसाठी नवोन्मेष) आराखड्यांतर्गत तयार केली आहे. प्रस्तावित कालमर्यादेत सुमारे 30 डीप-टेक महत्वपूर्ण आणि सामरिक तंत्रज्ञान विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. आधुनिक सशस्त्र दलांच्या अपेक्षा आणि आवश्यकता आणि संरक्षण नवोन्मेषी परिसंस्थेच्या क्षमता यांच्यातील दरी मिटवण्यासाठी ‘टेक्नॉलॉजी वॉच टूल’ अर्थात तंत्रज्ञान देखरेख साधन तयार करण्याचीही संकल्पना आहे.

तरुण नवोन्मेषकांना प्रेरित करण्यासाठी, 1.5 कोटी रुपयांवरून 10 कोटी रुपयांपर्यंत अर्थसहाय्य वाढवून आयडीईएक्स चा विस्तार आयडीईएक्स प्राइममध्ये करण्यात आला असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. सेवा आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्र उपक्रमाद्वारे दिलेल्या आव्हानांचे निराकरण करण्यात उत्साहवर्धक सहभागानंतर, अदिती योजना आता सुरू करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

अदिती, आयडीईएक्स, आयडीईएक्स प्राईम सारख्या योजना/उपक्रमांमागील संकल्पना देखील भारताला ज्ञानी समाजात परिवर्तित करण्याची आहे असे मत संरक्षण मंत्र्यांनी मांडले.

डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंज (डीआयएससी) च्या 11व्या आवृत्तीच्या उदघाटनाचाही हा कार्यक्रम होता, ज्याने संरक्षण आस्थापना आणि स्टार्ट-अप परिसंस्थेतील सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू केला. डीआयएससी 11 ने 22 समस्या विधाने सादर केली आहेत – ज्यात भारतीय लष्कर (4), भारतीय नौदल (5), भारतीय वायुसेना (5), आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (7) आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (1) च्या विधानांचा समावेश आहे. महत्वपूर्ण संरक्षण आव्हानांना तोंड देण्यासाठी, तसेच देशाची संरक्षण क्षमता वाढवणारे आणि राष्ट्रीय सुरक्षेला हातभार लावणारे नाविन्यपूर्ण उपाय प्रस्तावित करण्याकरिता नवकल्पकांना आमंत्रित करणे हा यामागचा उद्देश आहे.

या व्यतिरिक्त, डिफकनेक्ट 2024 मध्ये एक आवर्ती आयडीईएक्स अंतर्वासिता कार्यक्रम सुरू झाला. युवा प्रतिभा समृद्ध करून युवांना संरक्षण नवोपक्रमात अनुभव आणि मार्गदर्शन प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

शिवाय, संरक्षण स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, आयडीईएक्स ने आयडीईएक्स गुंतवणूकदार केंद्र (आयआयएच) अंतर्गत नवीन गुंतवणूकदारांसोबत सामंजस्य करार (एमओयू) जाहीर केला. या सामरिक भागीदारींनी आता 200 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांहून अधिक निधीची बांधिलकी दर्शवली आहे.

आयडीईएक्स स्टार्ट-अप्सच्या यशोगाथांवर प्रकाश टाकून, या समारंभात आयडीईएक्स विजेत्यांच्या गुंतवणुकीची घोषणा आणि आयडीईएक्स विजेत्यांचा सत्कार, त्यांचे नाविन्यपूर्ण उपाय आणि उद्योजकतेची भावना प्रदर्शित करण्यात आली.

यावेळी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी, संरक्षण सचिव गिरीधर अरमाने आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नौदल कमांडर्स परिषद-2024 च्या पहिल्या आवृत्तीचे आयोजन

Mon Mar 4 , 2024
नवी दिल्ली :- 2024 च्या नौदल कमांडर्स परिषदेची पहिली आवृत्ती 05 मार्च 24 पासून सुरू होत आहे. यावेळी ही परिषद हायब्रिड स्वरूपात होत असून परिषदेचा पहिला टप्पा समुद्रावर आयोजित केला जाणार आहे. परिषदेच्या उद्घाटन सत्रात भारतीय नौदलाच्या ‘ट्विन कॅरियर ऑपरेशन्स’ कार्यान्वित करण्याच्या क्षमतेचे प्रदर्शन करणाऱ्या दोन्ही विमानवाहू जहाजांच्या प्रात्यक्षिकाचे साक्षीदार होण्यासाठी संरक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत. ही परिषद अत्यंत महत्त्वाचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!