मुंबई : दिवंगत वि.प.स., शरद नामदेव रणपिसे, माजी वि.प.स. व माजी मंत्री मखराम बंडुजी पवार, माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार, माजी वि.प.स. सुरेश मोरेश्वर भालेराव, यांच्या दुःखद निधनाबद्दल विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक प्रस्ताव मांडला.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिवंगत शरद रणपिसे यांच्या आठवणीला उजाळा दिला. ते म्हणाले, शरद रणपिसे हे सुरुवातीला पर्वती मतदार संघातून निवडून आले होते. डाव्या विचारसरणीचा माणूस व बुद्धीस्ट विचारसरणीचा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे अचानकपणे आपल्या मधून निघून जाणे हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. सभागृहात एखादे विधेयक आल्यावर शरद रणपिसे यांच्याकडून हमखास दुरुस्ती यायची. सभागृहाची परंपरा प्रामाणिकपणे पाळणारे वेगळे व्यक्तीमत्व आपल्या मधून गेले. ही अतिशय दु:खद बाब आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माजी मंत्री मखराम बंडुजी पवार यांनी बंजारा समाजासाठी समाजकार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात कार्य केले आहे. माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शरद रणपिसेंना आपण सर्वजण जवळून ओळखत होतो. त्यांचे नेतृत्व अत्यंत शांत, संयमी, पुरोगामी, सुधारणावादी विचारांचे नेतृत्व होत. पण ते अजातशत्रु होते. त्यांच्या निधनाने सभागृहातील अभ्यासू संयमी नेतृत्व काळाच्या पडद्यामागे गेले आहे.
त्यांच्या प्रदीर्घकाळाचा अनुभव असलेल्या नेतृत्वाचा सभागृहातील सदस्यांना लाभ झाला. रणपिसे हे सभागृहाचे सर्व नियम, रुढी, परंपरा अवगत असलेले सदस्य होते. ते अत्यंत मृदूस्वभावाचे होते. त्यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान होते.
दिवंगत वि.प.स., शरद नामदेव रणपिसे, माजी वि.प.स. व माजी मंत्री मखराम बंडुजी पवार, माजी वि.प.स. प्रभाकर यशवंत दातार, माजी वि.प.स. सुरेश मोरेश्वर भालेराव यांच्या दु:खद निधनाबद्दल शोक प्रस्तावावर बोलत असताना सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद सदस्य जयंत पाटील, कपिल पाटील, यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या.